हजारो तरुणांना रोजगार मिळणार; १८ हजार पोलीस भरतीची जाहिरात निघणार, फडणवीसांची मोठी घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2022 12:47 PM2022-10-22T12:47:07+5:302022-10-22T12:53:03+5:30
रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधीही आम्ही उपलब्ध करून देऊ, असं फडणवीस म्हणाले.
नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोकरभरतीसंबधात महत्वाची घोषणा केली आहे. राज्यात ७५ हजार तरुणांना रोजगार देण्याची योजना राबवणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली आहे. त्या अंतर्गत, येत्या आठवड्यात १८ हजार पोलीस भरतीची जाहिरात निघणार असंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं आहे.
देवेंद्र फडणवीस आज नागपुरात बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकार राबवत असलेल्या रोजगार योजनेचं कौतुक केलं. पंतप्रधान मोदींच्या हस्ते राज्यभरातल्या तरुणांना रोजगार मेळाव्यात नियुक्तीपत्र देणार, अशी घोषण फडणवीस यांनी केली. तसेच, सगळ्या विभागांच्या जाहिराती काढून मोठ्या प्रमाणावर तरुणाईला नोकरभरतीत प्राधान्य देण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातही केला जाणार आहे.
फडणवीस म्हणाले, पंतप्रधान मोदींनी खूप चांगला निर्णय घेतला आहे. १० लाख तरुणांना रोजगार देण्याचा हा एक चांगला प्रोजेक्ट आहे. राज्यातही ७५ हजार तरुणांना नोकऱ्या देण्यासंदर्भात रोजगार योजना राबवण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या आठवडाभरात १८ हजार पोलीस भरतीची जाहीरातदेखील काढण्यात येईल. यासह सगळ्या विभागांच्या जाहिराती काढून मोठ्या प्रमाणात तरुणांना नोकरभरतीत प्राधान्य देण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातही केला जाणार आहे. या व्यतिरिक्त रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधीही आम्ही उपलब्ध करून देऊ, असं फडणवीस म्हणाले.