नारा जैवविविधता उद्यानात स्थानिकांना रोजगार :  पालकमंत्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 01:04 AM2021-04-06T01:04:00+5:302021-04-06T01:06:53+5:30

Nara Biodiversity Park ,Employment नारा जैवविविधता उद्यानामुळे शहरालगतच निसर्गभ्रमंतीची संधी नागपूरकरांना प्राप्त होणार असून, प्रस्तावित उद्यान निर्मिती कार्यामध्ये स्थानिक रोजगारांना विशेष प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचना पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी येथे केली.

Employment for locals in Nara Biodiversity Park: Guardian Minister | नारा जैवविविधता उद्यानात स्थानिकांना रोजगार :  पालकमंत्री 

नारा जैवविविधता उद्यानात स्थानिकांना रोजगार :  पालकमंत्री 

Next
ठळक मुद्देनागपूरकरांना निसर्गभ्रमंतीची संधी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर, : नारा जैवविविधता उद्यानामुळे शहरालगतच निसर्गभ्रमंतीची संधी नागपूरकरांना प्राप्त होणार असून, प्रस्तावित उद्यान निर्मिती कार्यामध्ये स्थानिक रोजगारांना विशेष प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचना पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी येथे केली.

नारा जैवविविधता उद्यान निर्मितीबाबत राऊत यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, प्रादेशिक उपवनसंरक्षक प्रभू नाथ शुक्ल, सल्लागार रवि बनकर आदी यावेळी उपस्थित होते.

नारा जैवविविधता उद्यानामध्ये पर्यटकांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध होण्यासाठी नियोजन करावे. येथील प्रस्तावित जलाशयाचे काम महापालिकेच्या अमृत योजनेंतर्गत करण्यात यावे. या जलाशयामध्ये कासव, विविध प्रजातीच्या माशांचे जतन करून त्यांची पैदास करावी. हे मासे विक्रीसाठीही उपलब्ध ठेवावे. या अधिवासात असणाऱ्या प्राण्यांसाठी निवास तसेच खाद्यान्नाची जागोजागी सुविधा निर्माण करावी. येथील हिरवीगार वनराई, विस्तीर्ण जलाशय, स्थानिक तसेच स्थलांतरित पक्षी, फुलपाखरे, प्राणी, वनस्पतींचे विविध प्रकार, गवती प्रजाती यामुळे पर्यटकांना येथे पक्षी निरीक्षणाचाही आनंद लुटता येणार आहे. या दृष्टीने व्यवस्थापन करण्यात यावे. या उद्यानात रोपवाटिकेची निर्मिती करावी. यात मोसमी फुलांसह औषधी गुणधर्मयुक्त वनस्पती, लाख, डिंक, रानमेवा तसेच विविध फुलझाडांची लागवड करण्यात यावी. स्थानिक स्तरावर ज्या फुलझाडांची विशेष मागणी होते, त्याचा अभ्यास करून त्यांचे उत्पादन घेण्यात यावे. येथील फुलांची तसेच रोपांची विक्री रोपवाटिकेमार्फत करावी. मासे, रोपवाटिकेतील रोपे, फुलझाडे, मध या सर्वांच्या विक्रीतून मिळालेला महसूल उद्यानाच्या व्यवस्थापनासाठी उपयोगात आणावा, अशा सूचना राऊत यांनी यावेळी केल्यात.

विविध प्रकारचे २५३ वृक्ष, २०० चितळ

कोराडी रोडवरील नारा जैवविविधता उद्यानाची प्रस्तावित जागा २१.७५ हेक्टर असून, या उद्यानाचे व्यवस्थापन नागरी संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडे देण्यात येणार आहे. येथे सद्यस्थितीत कडुनिंब, शिवपुरा, निलगिरी, गुलमोहर, साग, चंदन असे विविध प्रकारचे जवळपास २५३ वृक्ष आहेत. तसेच प्राण्यांमध्ये २०० चितळ आहेत. या प्रस्तावित जैवविविधता उद्यानामध्ये ट्रेकिंग, योगा, ध्यानधारणा कक्ष, खुले सभागृह, गांडूळ खतनिर्मिती, स्वच्छतागृहे, स्वच्छ पिण्याचे पाणी, पार्किंग या सर्व सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध राहणार असल्याची माहिती शुक्ल यांनी यावेळी दिली.

Web Title: Employment for locals in Nara Biodiversity Park: Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.