लॉजिस्टिक पार्कमुळे रोजगार

By admin | Published: October 16, 2016 02:53 AM2016-10-16T02:53:47+5:302016-10-16T02:53:47+5:30

फेटरी - जामठा दरम्यानच्या बाह्य वळण मार्गामुळे विकासासोबतच रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

Employment from Logistic Park | लॉजिस्टिक पार्कमुळे रोजगार

लॉजिस्टिक पार्कमुळे रोजगार

Next

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : चौपदरी बाह्य वळण मार्गाचा कोनशिला समारंभ
कळमेश्वर : फेटरी - जामठा दरम्यानच्या बाह्य वळण मार्गामुळे विकासासोबतच रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या रिंगरोडवर लॉजिस्टिक पार्क उभारला जाणार असल्याने यातून तसेच मेट्रो रिजनमुळे किमान ५० हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या बाह्य वळण मार्गाचे शनिवारी सायंकाळी फेटरी येथे भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, खा. डॉ. विकास महात्मे, आ. प्रवीण दरेकर, आ. डॉ. आशिष देशमुख, आ. सुधीर पारवे, आ. डी. एम. रेड्डी, माजी खा. दत्ता मेघे, माजी आ. अशोक मानकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश मानकर, राजेश जीवतोडे, सरपंच ज्योती राऊत, विजय घोरमाडे, संजय टेकाडे उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नामुळे राज्यातील रस्ते विकासासाठी दोन लाख कोटी रुपये मिळाले आहे. जामठा ते फेटरी या बाह्यवळण मार्गामुळे उद्योग व व्यापारात गुंतवणूक वाढणार असून, रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. शिवाय, नागपूर शहर देशातील सुंदर शहर म्हणून ओळखले जाणार आहे. जीएसटीमुळे नागपूर शहराचे महत्त्व वाढणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, बाह्यवळण रस्ता नागपूर शहर व जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या मार्गावरील झाडे न तोडता त्याचे पुनरारोपण केले जाईल. वाडी परिसरातील गोदामे हलविण्यात येईल. डोंगरगाव येथे विविध सुविधा उपलब्ध होतील. नागपूर शहरात २४ तास पिण्याचे पाणी मिळेल. शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी इथेनॉलवर चालणाऱ्या ५० बसेस देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Employment from Logistic Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.