राज्यभरात होणार रोजगार मेळावे

By admin | Published: March 26, 2017 01:43 AM2017-03-26T01:43:42+5:302017-03-26T01:43:42+5:30

देशातील सर्व बेरोजगारांना २०२२ पर्यंत उपजीविकेचे साधन मिळवून देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम महत्त्वाचा आहे.

Employment Meetings will take place across the state | राज्यभरात होणार रोजगार मेळावे

राज्यभरात होणार रोजगार मेळावे

Next

संभाजी पाटील निलंगेकर : ‘युथ एम्पॉवरमेंट समिट’चे थाटात उद््घाटन, तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर : देशातील सर्व बेरोजगारांना २०२२ पर्यंत उपजीविकेचे साधन मिळवून देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम महत्त्वाचा आहे. यासाठी ’युथ एम्पॉवरमेंट समिट’ हा कार्यक्रम अतिशय संयुक्तिक आहे. तेव्हा हा कार्यक्रम केवळ नागपूर पुरता मर्यादित न राहता तो राज्यशासनाचा कार्यक्रम व्हावा. राज्यात प्रत्येक विभागात व जिल्ह्यात नागपूरप्रमाणे रोजगार मेळावे आयोजित केले जातील, अशी घोषणा राज्याचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी येथे केली. युवकांनी या रोजगार मेळाव्यांचा उपयोग करून विविध कौशल्ये आत्मसात करावीत आणि विपरीत परिस्थितीवर मात करत आयुष्यात स्थिर व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात फॉर्च्युन फाऊंडेशन, इंजिनिअरिंग कॉलेजेस प्लेसमेंट असोसिएशन व नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने युथ एम्पॉवरमेंट समिट, या तीन दिवसीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी संभाजी पाटील निलंगेकर बोलत होते
व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, फॉर्च्युन फाऊंडेशनचे अध्यक्ष आ. प्रा. अनिल सोले, आ. आशिष देशमुख, केंद्रीय कौशल्य विकास विभागाचे सहसचिव सुनील भारद्वाज, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालयाचे आयुक्त विजय वाघमारे, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समितीचे सभापती संदीप जाधव, मनपा सत्तापक्ष नेते संदीप जोशी, नासुप्र विश्वस्त भूषण शिंगणे, कौशल्य विभागाचे सहायक संचालक डी.एम. गोस्वामी, माजी महापौर प्रवीण दटके, सुभाष पारधी, शिवानी दाणी, सुनील त्यागी, नवनीतसिंग तुली, जयंत पाठक, कपिल चांद्रायण आदी उपस्थित होते. संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील युवकांच्या हाताला काम मिळावे यासाठी विदर्भात मोठ्या प्रमाणात उद्योग आणत असून त्या उद्योगाच्या माध्यमातून युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहेत. त्या संधीचे युवकांनी सोने करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, युवकांनी आवडीचे क्षेत्र निवडावे. पदवीचे ओझे झुगारून पुढे जाण्याची जिद्द युवकांनी आत्मसात करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. कौशल्य विकास विभागाचे सहसचिव सुनील भारद्वाज म्हणाले, केंद्र शासनाने युवकांसाठी सुरू केलेला कौशल्य विकास कार्यक्रम युवकांना प्रेरित करीत असून त्यामुळे युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. आजच्या युवकांना रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हावी, याकरिता राज्य व केंद्र शासनाकडे सतत पाठपुरावा करत आहे. त्याकरिता केंद्र शासनाने युवकांना रोजगार व उद्योगविषयी माहिती देण्याकरिता अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपवर सर्व प्रकारच्या रोजगाराची माहिती युवकांना मिळणार असून युवकांनी त्याचा फायदा घ्यावा, असे आवाहन केले.मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, युवकांना नामांकित कंपनी, विविध संस्थेत रोजगाराची संधी उपलब्ध असताना आजच्या युवक त्याकडे वळत नाही. एखाद्या कंपनीत लठ्ठ पगाराची नोकरी करावी. असा त्यांचा उद्देश असतो. परंतु भविष्यात करिअर बनवायचे असेल तर, आपल्यातील कौशल्याचा विकास करावा. ज्या क्षेत्रात करिअर बनवाल त्या क्षेत्रातील कौशल्य आत्मसात करा. असेही ते म्हणाले. संचालन रेणुका देशकर यांनी केले. स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते
यशस्वी युवकांचे आज कौतुक
फॉर्च्युन फाऊंडेशनतर्फे मागील नऊ महिन्यात विविध शिबिरांच्या माध्यमातून तब्बल १०५८ तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सर्व यशस्वी युवकांचे अभिनंदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २६ मार्च रोजी सकाळी १० वाजता करण्यात येईल. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले प्रामुख्याने उपस्थित राहतील.

तीन दिवसात ५ हजार युवकांना रोजगार देण्याचा उद्देश
फॉर्च्युन फाऊंडेशनचे अध्यक्ष आ. प्रा. अनिल सोले यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले, भारत जगामध्ये युवकांचा देश म्हणून ओळखला जात आहे. देशाचे खरे नेतृत्व आजचा युवक करू शकतो. कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या मेळाव्यातून पुढच्या तीन दिवसात ५ हजार विद्यार्थ्यांना विविध कंपन्या व संस्थेच्या माध्यमातून रोजगार देण्याचा उद्देश आहे. तसेच स्वयंरोजगाला प्रोत्साहन देण्याकरिता मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
दोन हजार युवकांना रोजगार देण्याचा सामंजस्य करार
यावेळी कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत फॉर्च्युन फाऊंडेशनने नामांकित कंपनी ‘इप्टाबेस’ व ‘व्ही ग्लोकल’ कंपनीशी विदर्भातील दोन हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

Web Title: Employment Meetings will take place across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.