तीन हजारावर तरुणांना रोजगार
By admin | Published: March 28, 2017 01:50 AM2017-03-28T01:50:04+5:302017-03-28T01:50:04+5:30
मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या यूथ एम्पॉवरमेंट समिटचा सोमवारी समारोप झाला.
पुढच्या वर्षी पाच हजार तरुणांना रोजगार देण्याचा संकल्प : हजारो तरुण-तरुणींनी घेतला लाभ
नागपूर : मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या यूथ एम्पॉवरमेंट समिटचा सोमवारी समारोप झाला. या रोजगार मेळाव्याला नागपूरसह विदर्भातील तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग घेतला. हजारो तरुण-तरुणींनी आपली नोंदणी केली. मार्गदर्शनाचा लाभ घेतला. या तीन दिवसात जवळपास तीन हजारावर तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करून देण्यात हा मेळावा यशस्वी ठरला. पुढच्या वर्षी यापेक्षाही अधिक जोमाने आणि सर्वांच्या सहकार्याने याच मेळाव्यात पाच हजार तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करून देण्याचा संकल्प यावेळी फॉर्च्युन फाऊंडेशनचे अध्यक्ष व मेळाव्याचे संयोजक आ. अनिल सोले यांनी केला.
फॉर्च्युन फाऊंडेशन, इंजिनिअरिंग कॉलेजेस प्लेसमेंट असोसिएशन आणि नागपूर महानगरपालिका यांच्यातर्फे वसंतराव देशपांडे सभागृह व परिसरात तीन दिवसीय यूथ एम्पॉवरमेंट समिट आयोजित करण्यात आले होते. कौशल्य विकास विभाग मिहान, क्रीडा, युवक कल्याण व सांस्कृतिक विभाग, उद्योग विभाग, सामाजिक न्याय विभाग, वन व पर्यटन विभाग, नेहरू युवा केंद्र, नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, दीनदयाल कौशल्य योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका मनपा, प्रमोद महाजन कौशल्य योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अॅण्ड टे्रनिंग इन्स्टिट्यूट (बार्टी), आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या सहकार्याने तीन दिवसाच्या या रोजगार मेळाव्याला तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध विभागांमध्ये उपलब्ध असलेल्या नोकरींच्या संधी आणि स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन मिळाले. मुद्रा लोनची माहिती मिळाली. केवळ माहिती व मार्गदर्शनच नव्हे तर अनेकांना प्रत्यक्षात नोकरीही मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन तर युवकांना एक नवीन ऊर्जा देऊन गेले. (प्रतिनिधी)