कंपन्यांचे इमले अन् नातेवाईकांना सापळे
By admin | Published: March 25, 2017 02:48 AM2017-03-25T02:48:19+5:302017-03-25T02:48:19+5:30
लाघवी बोलणे, हसतमुख आणि विनम्र स्वभावाचा धनी असलेल्या व्यक्तीत थंड डोक्याचा गुन्हेगार दडला असेल, अशी कुणी कल्पनाही करू शकत नाही.
नरेश डोंगरे नागपूर
लाघवी बोलणे, हसतमुख आणि विनम्र स्वभावाचा धनी असलेल्या व्यक्तीत थंड डोक्याचा गुन्हेगार दडला असेल, अशी कुणी कल्पनाही करू शकत नाही. मात्र, ज्या कुणी ठगबाज रजनिश सिंगचा अनुभव घेतला, ती मंडळी भविष्यात प्रामाणिक व्यक्तींवरही विश्वास ठेवणार नाही. होय, केसाने गळा कापावा या उक्तीचा परिचय देणारी व्यक्ती म्हणजे ठगबाज रजनिश सिंग होय. कट आखायचा, संबंधित व्यक्तीभोवती सापळा लावायचा आणि गुन्हा करायचा, अशी पद्धत अवलंबणाऱ्या रजनिशने मोठ्या रक्कमेच्या फसवणुकीची सुरुवात आपल्या नजिकच्या व्यक्तींपासूनच केली. एका दशकापासून विविध व्यक्ती आणि वित्तीय संस्थांना कोट्यवधींचा गंडा घालून ऐशोआरामाचे जीवन जगणाऱ्या ठगबाज रजनिशच्या फसवणुकीचे अनेक किस्से त्याच्या निकटस्थ व्यक्तीने लोकमतजवळ व्यक्त केले आहेत. एवढेच काय, त्याने लग्नापूर्वी आणि लग्नानंतर स्वत:च्या पत्नी आणि नातेवाईकांनाही पैशासाठी फसवले. खुद्द रजनिशची पत्नी सुनीता यांनी लोकमतशी बोलताना त्याच्या फसगतीची उदाहरणे सांगितली.
मूळचा जबलपूर येथील रहिवासी असलेला रजनिश ‘थंड डोक्याचा गुन्हेगार’ आहे. प्रारंभी गोरगरिबांची फसवणूक करणाऱ्या रजनिशने आपल्या पापावर पांघरुण घालण्यासाठी आणि स्वत:भोवती सुरक्षा कवच निर्माण करण्यासाठी १४ वर्षांपूर्वी राज्य शासनात वरिष्ठ पदावर असलेल्या एका व्यक्तीशी ओळख वाढवली.
प्रारंभी कार्यालयात अन् नंतर घरी चकरा मारून या अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांशी सलगी साधून त्याने त्यांचा विश्वास जिंकला. नंतर या कुुटुंबातील सुस्वरुप युवतीला मागणी घातली. विनम्र स्वभाव, लाघवी बोलणे आणि बऱ्यापैकी ‘उद्योग‘ करणाऱ्या रजनिशवर विश्वास करून कुटुंबीयाने त्याला आपली मुलगी दिली. लग्न झाल्यानंतर त्याने पत्नीसोबत सासरच्या मंडळींकडून वेगवेगळी गाऱ्हाणी मांडून लाखोंची रक्कम उकळली. पत्नीला मिळालेली कारही विकली. हे करताना बाहेर त्याने स्वत:च्या सासरच्या मंडळींची ओळख दुसऱ्यांची फसवणूक करण्यासाठी वापरली. एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याचा जावई असल्याचे कळाल्याने त्याचा फसवणुकीचा मार्ग सहज होत होता. दर काही महिन्यानंतर तो कुणाला न कुणाला लाखोंचा चुना लावत होता.
विशेष म्हणजे, त्याची पत्नी सुनीता गर्भवती असताना त्याने त्यांच्या विविध कागदपत्रांसह काही चेकवरही सह्या करून घेतल्या. या कागदपत्राच्या आधारे लाखोंचे कर्ज उचलले. या सर्व प्रकारापासून सुनीता सिंग पूर्णत: अनभिज्ञ होत्या.
उचललेल्या कर्जाचे हप्ते थकल्याने बँकेचे वसुली पथक घरी धडकल्यामुळे सुनीता यांना त्यांच्या नावाने कर्ज उचलल्याची धक्कादायक बाब कळली. कर्ज आणि व्याजाची रक्कमही थोडीथोडकी नव्हे तर चक्क दीड कोटी रुपये होती. हादरलेल्या सुनीता यांनी रजनिशला याबाबत विचारणा केली असता त्याने कानावर हात ठेवले.
काही दिवसानंतर रक्कम नसताना धनादेश देऊन फसवणूक करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल होऊन अटक होण्यापर्यंतची वेळ सुनीता यांच्यावर ओढवली. आपला संबंध नसताना ओढवलेली आफत पाहून सुनीता यांनी चौकशी केली तेव्हा काही दिवसांपूर्वी रजनिशने धनादेशावर सह्या मागितल्या होत्या, त्याच धनादेशाचा गैरवापर करून रजनिशने अडचणीत आणल्याचे सुनीता यांना कळाले. स्वत:चा पतीच शत्रूसारखा वागत असल्याचे लक्षात आल्यामुळे सुनीता यांनी ठगबाज पतीविरुद्ध कणखर भूमिका घेतली. आपल्या प्रतिष्ठेचा जावई गैरवापर करीत असल्याचे कळाल्याने सुनीताच्या माहेरची मंडळीही त्यांच्या पाठीशी उभी राहिली अन् अखेर ठगबाज रजनिशविरुद्ध गुन्हा दाखल झाला.