रिकाम्या भूखंडामुळे डोकेदुखी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:10 AM2021-03-01T04:10:11+5:302021-03-01T04:10:11+5:30
म्हाडा क्वॉर्टरमध्ये पाण्याची टंचाई नागपूर : नारीच्या मागील परिसरात असलेल्या म्हाडामधील नागरिकांना आतापासूनच पाण्याच्या टंचाईशी सामना करावा लागत आहे. ...
म्हाडा क्वॉर्टरमध्ये पाण्याची टंचाई
नागपूर : नारीच्या मागील परिसरात असलेल्या म्हाडामधील नागरिकांना आतापासूनच पाण्याच्या टंचाईशी सामना करावा लागत आहे. अनेक वर्षांपूर्वी येथे क्वाॅर्टर बांधण्यात आले. मात्र अद्यापही मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. या परिसरातील मार्ग उखडले आहेत. स्ट्रीट लाईट नाही. सर्वात मोठी समस्या पाण्याची आहे. यामुळे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
जाहिरातीसाठी झाडांचा उपयोग
नागपूर : जाहिराती लावण्यासाठी आता चक्क झाडांवर खिळे ठोकून होर्डिंग अडकविले जात आहेत. कॅनल रोडलगतच्या जवळपास सर्वच मार्गावर असलेल्या झाडांवर जाहिरातीचे होर्डिंग अडकविलेले दिसत आहेत. असे असूनही या प्रकारावर कुणीही आक्षेप घेतलेला नाही किंवा कारवाई झालेली नाही.
दारुड्यांमुळे रस्ता होतो नेहमीच जाम
नागपूर : गिट्टीखदान चौकावर दररोज दारुड्यांची गर्दी होते. यामुळे तेथे जाम लागतो. मद्यखरेदीसाठी नागरिक वाहनांनी येतात. अगदी रोडवर वाहने उभी केली जातात. यामुळे नागरिकांना नाहक अडचणीचा सामना करावा लागतो. बराच वेळ हॉर्न वाजवूनही प्रतिसाद मिळत नाही. अखेर नाईलाज होतो. मात्र याकडे पोलिसांचे किंवा वाहतूक विभागाचे लक्ष गेलेले दिसत नाही.
रस्त्यावर खड्डे, खड्ड्यात पाणी
नागपूर : रस्त्यावर खड्डे आणि खड्ड्यात पाणी अशी सध्या शहरातील काही भागात अवस्था आहे. नागरिकांना त्रास सहन करावा लागत असला तरी प्रशासनाला अद्याप जाग आलेली दिसत नाही. खड्ड्यांची दुरुस्त करण्याकडे लक्ष नाही. सदर माऊंट रोडवर तर एवढा खोल खड्डा आहे की अनेकदा वाहने त्यात फसतात, अपघात होतात. रस्ता आधीच अरुंद, त्यात अतिक्रमणाने वेढल्याने पुरती वाट लागली आहे.
तुटलेल्या सुरक्षा भिंतीआड कचरा डंपिंग यार्ड
नागपूर : शहरात एकीकडे स्वच्छता अभियान चालविले जात आहे. तर दुसरीकडे जागोजागी कचऱ्याचे डंपिंग यार्ड होत आहेत. काटोल रोडजवळील पोलीस क्वाॅर्टर भागातील सुरक्षा भिंत तुटली आहे. मात्र कचरा गाडीवाले घराघरांतून आणलेला कचरा येथेच टाकतात. परिणामत: या भागात जनावरे, डुकरांचा त्रास सुरू झाला आहे. अस्वच्छताही पसरली आहे. हा प्रकार बंद करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.