रिकामे भूखंड ठरताहेत धाेकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:09 AM2021-09-19T04:09:25+5:302021-09-19T04:09:25+5:30
दिनकर ठवळे लाेकमत न्यूज नेटवर्क काेराडी : नागपूर शहरालगतच्या बाेखारा (ता. नागपूर ग्रामीण) ग्रामपंचायतच्या हद्दीतील नवीन ले-आऊट तयार करण्याचा ...
दिनकर ठवळे
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेराडी : नागपूर शहरालगतच्या बाेखारा (ता. नागपूर ग्रामीण) ग्रामपंचायतच्या हद्दीतील नवीन ले-आऊट तयार करण्याचा सपाटा सुरू आहे. येथील बहुतांश रिकाम्या भूखंडांवर पावसाचे पाणी साचल्याने त्यांना तलावाचे स्वरुप प्राप्त झाले असून, परिसरात गवत व झुडपे वाढली आहेत. या सर्व बाबी मानवी आराेग्यास धाेकादायक ठरणाऱ्या आहेत, असे आराेग्य विभागाने नुकत्याच केलेल्या निरीक्षणात आढळून आले आहे.
बाेखारा येथे नवीन ले-आऊटची निर्मिती हाेत असून, अनेकांनी गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने भूखंड खरेदी केले आहेत. गरजूंनी मात्र त्यांच्या भूखंडांवर घरांचे बांधकाम करून त्यात राहायला सुरुवात केली आहे. भूखंडधारकांनी त्यांच्या रिकाम्या भूखंडांकडे दुर्लक्ष केले आहे. या भूखंडांवर कुणाचाही वावर नसल्याने त्यात माेठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. काही भूखंडांवरील पाण्याचा निचरा न झाल्याने दुर्गंधी सुटली आहे. बहुतांश रिकाम्या भूखंडांवर माेठ्या प्रमाणात काटेरी झुडपे व गवत वाढले आहे.
या ग्रामपंचायत अंतर्गत चारही बाजूला मोठ्या प्रमाणात नवीन नागरी वस्त्या, औद्योगिक व शैक्षणिक संकुले आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाला नागरी सुविधा पुरविणे कठीण जात आहे. भूखंडधारकांनी त्यांचे भूखंड साफ ठेवावे, तसेच न केल्यास त्यांना नाेटीस बजावून दंडात्मक कारवाई करावी यासाठी ग्रामपंचायत प्रशासन काहीच करायला तयार नाही, असा आराेप नागरिकांनी केला आहे.
...
मानवी आराेग्यावर प्रश्नचिन्ह
रिकाम्या भूखंडांवर माेठ्या प्रमाणात पाणी साचल्याने डासांची प्रचंड पैदास हाेत आहे. याच परिसरात झाडे व झुडपे वाढली असल्याने त्यात साप, विंचू व इतर विषारी कीटक तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावरही वाढला आहे. डासांमुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांना मलेरिया व कीटकजन्य आजार हाेण्याची तसेच साप व विंचवांमुळे त्यांच्या जीवितास धाेका उद्भवण्याची शक्यता बळावली आहे. बाेखारा येथील डेंग्यू व मलेरियाच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता ग्रामपंचायत प्रशासनाने वेळीच याेग्य उपाययाेजना कराव्या, असेही पाहणी अहवालात नमूद केले आहे.
...
पाहणी अहवालातील बाबी
बाेखारा येथील नागरिकांच्या वाढत्या तक्रारींमुळे गुमथी प्राथमिक आराेग्य केंद्राचे पी. बी. सुरकार व कर्मचाऱ्यांनी या संपूर्ण परिसराची पाहणी केली. त्यांनी पाहणी अहवाल ग्रामपंचायतला सादर केला. लाेणारा राेडकडे जाणारी पाईप लाईन फुटल्याने माेठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय हाेत आहे. विहिरींचा परिसर गलिच्छ आहे. शिवमंदिर शेजारी असलेल्या टाकीजवळ तसेच इतर ठिकाणचे खड्डे बुजविण्यात न आल्याने ते धाेकादायक बनले आहे. पाण्याचे डबके तयार झाले आहेत. माॅडर्न स्कूलजवळ डबक्यांची संख्या अधिक असून, ते साथीच्या राेगांना निमंत्रण देत आहेत. भूखंडांवरील साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावावी. त्यावरील गवत व झुडपे साफ करावी यासह अन्य सूचना या अहवालात नमूद केल्या आहेत.
...
भूखंडधारकांनी त्यांच्या रिकाम्या भूखंडावरील साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावावी तसेच गवत व झुडपे ताेडून भूखंड साफ करावे. ग्रामपंचायतने दिलेल्या सूचनांचे भूखंडधारकांनी पालन न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
- अनिता पंडित,
सरपंच, बाेखारा.