लघु उद्योग व भारतीय स्टार्टअप्सला प्रोत्साहन द्या; संघ परिवाराची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 12:34 PM2020-07-18T12:34:25+5:302020-07-18T12:34:53+5:30
देशांतर्गत उद्योगाची वाढ होण्यासाठी स्वदेशीवर संघ परिवाराचा भर आहे. स्वदेशीच्या प्रसारासाठी डिजिटल जागृतीवर भर देण्यात येत असून स्वदेशी स्वावलंबन मोहिमेच्या माध्यमातून समाजातील विविध स्तरांत जनजागृती करण्यात येत आहे.
योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना तसेच गलवान खोऱ्यातील घटनांमुळे भारतीयांमध्ये चीनविरोधात संताप निर्माण झाला आहे. अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलेल्या विविध संघटनांनीदेखील पुढाकार घेतला आहे. देशांतर्गत उद्योगाची वाढ होण्यासाठी स्वदेशीवर संघ परिवाराचा भर आहे. स्वदेशीच्या प्रसारासाठी डिजिटल जागृतीवर भर देण्यात येत असून स्वदेशी स्वावलंबन मोहिमेच्या माध्यमातून समाजातील विविध स्तरांत जनजागृती करण्यात येत आहे. विशेषत: लघु उद्योग व स्टार्टअप्सला समाजाने जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावे, अशी आग्रही भूमिका मांडण्यात येत आहे.
स्वदेशीला प्रोत्साहन देण्याची संघ परिवाराची नेहमीच भूमिका राहिलेली आहे. मात्र जागतिकीकरणाच्या लाटेत संघ परिवाराला अर्थव्यवस्थेवर चीनकडून झालेले आक्रमण थोपविता आले नाही. स्वस्त दरात विक्रीच्या नावाखाली चीनमधून आयात होणाºया अनेक वस्तूंनी भारतीय बाजारपेठ काबीज केली. डोकलाममध्ये चीनने कुरापती केल्यानंतर २०१७ साली संघातर्फे चिनी ड्रॅगन विरोधात देशभरात मोहीम राबविण्यात आली होती.
सीमेवर धोकादायक ठरु शकणारा चीन आर्थिक बाबतीतदेखील घातक असल्याने संघ परिवाराने त्यांना आर्थिक दणका देण्यासाठी मे महिन्यापासून स्वदेशी स्वावलंबन मोहिमेला वेग दिला आहे.
याअंतर्गतच नागरिकांकडून डिजिटल अर्ज भरुन घेण्यात येत आहे. आतापर्यंत या माध्यमातून देशभरात लाखो लोकांपर्यंत पोहोचून जागृती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सणांमध्ये स्वदेशीवर फोकस करा
पुढील कालावधी हा विविध सणांचा राहणार असून विदेशी व विशेषत: चिनी बनावटीच्या वस्तू मोठ्या प्रमाणात बाजारात दिसून येतात. परंतु सणांच्या कालावधीत विदेशी सामान टाळण्यासंदर्भातदेखील संघ परिवाराकडून जागृती करण्यात येत आहे. स्वदेशी जागरण मंचसह संघ परिवारातील विविध संघटना यात समाविष्ट आहेत. विदेशी उत्पादनांच्या बदल्यात कुठली भारतीय उत्पादने उपलब्ध आहेत, याची माहितीदेखील या मोहिमेंतर्गत ऑनलाईन माध्यमातून देण्यात येत आहे.
प्रत्यक्ष गृहसंपर्क नाही
एरवी अशा उपक्रमांत समाजात प्रत्यक्ष गृहसंपर्कावर भर असतो. परंतु कोरोनामुळे प्रत्यक्ष घरोघरी जाणे हिताचे नाही. त्यामुळेच डिजिटल माध्यमावर भर देण्यात येत आहे. स्वदेशी स्वावलंबन मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांना स्वदेशीचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. समाजातील विविध मान्यवर व्यक्ती तसेच संघटनादेखील यात सहभागी झाल्या आहेत, अशी माहिती स्वदेशी जागरण मंचचे अखिल भारतीय विचार विभाग प्रमुख अजय पत्की यांनी दिली.