विद्यापीठाच्या जागा अतिक्रमण करण्यासाठी का? शिवसेनेचा विद्यापीठाला सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 11:10 PM2018-12-10T23:10:24+5:302018-12-10T23:11:15+5:30
डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या नागपुरातील मोक्याच्या जागेवर लॉन, हॉटेल व अन्य व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. करोडो रुपयांच्या जागेवर व्यावसायिकांनी डल्ला मारल्यानंतर विद्यापीठ प्रशासन चूप क से काय? विद्यापीठाच्या जागा अतिक्रमणासाठी आहे का? असा सवाल शिवसेनेचे शहर प्रमुख प्रकाश जाधव यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांना केला. कोणत्याही परिस्थितीत महाराजबाग बंद पडायला नको, असा इशारा देत शिवसेनेने रास्ता रोको केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या नागपुरातील मोक्याच्या जागेवर लॉन, हॉटेल व अन्य व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. करोडो रुपयांच्या जागेवर व्यावसायिकांनी डल्ला मारल्यानंतर विद्यापीठ प्रशासन चूप क से काय? विद्यापीठाच्या जागा अतिक्रमणासाठी आहे का? असा सवाल शिवसेनेचे शहर प्रमुख प्रकाश जाधव यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांना केला. कोणत्याही परिस्थितीत महाराजबाग बंद पडायला नको, असा इशारा देत शिवसेनेने रास्ता रोको केला.
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने महाराजबागेची मान्यता रद्द केल्यामुळे शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेने आंदोलन करून विद्यापीठ प्रशासनाला हालवून सोडले होते. सोमवारी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले हे नागपुरात असल्याने आज पुन्हा शिवसेना महाराजबागेसंदर्भात कुलगुरूंची भूमिका जाणून घेण्यासाठी महाविद्यालयात पोहचली. यावेळी कुलगुरूंसोबत सुरू असलेल्या चर्चेत अॅग्रोव्हेट अॅग्रोइंजिनीअर्स मित्र परिवाराचे प्रणय पराते यांनी विद्यापीठाच्या जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाचा विषय कुलगुरूंपुढे ठेवला. या विषयावर शिवसेनेने कुलगुरूंना चांगलेच धारेवर धरले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील जमिनीवर अनेक वर्षांपासूनचे अतिक्रमण होते. विद्यापीठ प्रशासनाने तत्परता दाखवत त्या जमिनी अतिक्रमणधारकांच्या घशातून मोकळ्या केल्या. मात्र डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शहरातील जागेवर अतिक्रमण करून व्यावसायिक व्यवसाय करीत आहे. विद्यापीठाचे हात कुणी बांधले आहे का? कुणीही येतो आणि जागेवर अतिक्रमण करतो. अतिक्रमण करण्यासाठी विद्यापीठाच्या जागा आहेत का? असा सवाल शिवसेनेने कुलगुरूंना केला. महाराजबाग प्राणिसंग्रहालयाच्या बाजूनेच एक रस्ता काढला आहे. त्यापलीकडे दीड एकर जागा मोकळी सोडली. त्या ठिकाणी काय उभारणार, त्याचा प्लान सादर करण्याची मागणी त्यांनी केली. काचीपुरा येथील जागेवर हॉटेल सुरू असून काही लॉनही व शाळाही आहेत. न्यायालयाचे निर्णय असताना विद्यापीठ कारवाई का करीत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेच्या प्रश्नांच्या सरबत्तीमुळे उत्तर देताना प्रशासनाची चांगलीच दमछाक होत होती.
त्यापूर्वी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महाराजबागेच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी केली. प्राणिसंग्रहालय बंद करण्यामागे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप शिवसेनेने केला. बैठकीनंतर शिवसैनिकांनी महाराजबागेसमोरील रस्त्यावर घोषणाबाजी केली. यावेळी वाहतुकीस अडचण होत असल्याने, पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक किशोर कुमेरिया, नितीन तिवारी, रवनीश पांडे, राजू तुमसरे, हितेश यादव आदी शिवसैनिक सहभागी झाले होते.
माझ्याकडे येण्यापेक्षा मंत्र्यांकडे जा
अॅग्रोव्हेट अॅग्रोइंजिनीअर्स मित्र परिवार व श्री आरोग्य आसन मंडळातर्फे महाराजबागेच्या संदर्भात कुलगुरू डॉ. विलास भाले यांना निवेदन देण्यात आले. केंद्रीय प्राधिकरणाने ज्या ४६ त्रुटी काढल्या आहेत, त्याच्या पूर्ततेसाठी काय उपाययोजना केल्या यासंदर्भात विचारणा केली. मात्र कुलगुरू म्हणाले की विद्यापीठ स्तरावर आम्ही त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण माझ्याकडे येण्यापेक्षा मंत्र्यांकडे जावे, त्याचा चांगला परिणाम होईल, असे सांगितले. यावेळी अॅग्रोव्हेटचे दिलीप मोहितकर, प्रणय पराते, डॉ. अजय तायवाडे, मिलिंद राऊत यांच्यासह आसन मंडळाचे प्रमोद नरड, दिलीप नरवडिया उपस्थित होते.