आवंडी येथे सरकारी पांदण रस्त्यावर अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:08 AM2021-06-03T04:08:05+5:302021-06-03T04:08:05+5:30
कामठी : तालुक्यातील आवंडी येथे नागपुरातील एका शेतकऱ्याने सरकारी पांदण रस्त्यावर अतिक्रमण केल्याने इतर शेतकऱ्यांना याचा फटका बसतो आहे. ...
कामठी : तालुक्यातील आवंडी येथे नागपुरातील एका शेतकऱ्याने सरकारी पांदण रस्त्यावर अतिक्रमण केल्याने इतर शेतकऱ्यांना याचा फटका बसतो आहे. त्यामुळे हे अतिक्रमण तातडीने हटविण्याच्या मागणीसाठी स्थानिक शेतकऱ्यांनी तहसीलदारांना पत्र दिले आहे.
पटवारी हल्का नंबर २१, खसरा नंबर १७३ चे शेतमालक रणजित जैन यांनी आवंडी-लिहिगाव मार्गाला लागून असलेल्या सरकारी पांदण रस्त्यावर अतिक्रमण करून खोदकाम करीत रस्ता आपल्यासोबत शेतात समाविष्ट केला आहे. त्यामुळे या पांदण रस्त्याने जाणाऱ्या शेतकऱ्यांनी रणजित जैन यांना, रस्ता का खोदता, अशी विचारणा केली असता त्यांनी शेतकऱ्यांना धाक दिला. याबाबत शेतकऱ्यांनी सरपंच शालू मोहोळ व पटवारी एम. एस. वकील यांना माहिती देत घटनास्थळी घेऊन गेले असता, त्यांनाही रणजित जैन यांनी, मी माझे काम बरोबर करीत आहे, तुम्ही यात हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचे सांगितले. पांदण रस्त्यावर अतिक्रमण केल्याने या मार्गाने जाणारे शेतकरी राजू हिवरे, भावराव चंदनखेडे, राजू चंदनखेडे, वसंत भोयर, चंद्रकांत गजभिये, सुरेश मोहोळ, विनायकराव चंदनखेडे यांना शेतात जाण्याकरिता मोठी अडचण निर्माण झाली आहे. शेतात जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे शेती कशी करावी, असा प्रश्न त्यांनी तहसीलदार अरविंद हिंगे यांना दिलेल्या पत्रात केला आहे.