मोमीनपुरा मार्गावरील अतिक्रमण हटविले
By admin | Published: July 12, 2016 03:07 AM2016-07-12T03:07:25+5:302016-07-12T03:07:25+5:30
मोमीनपुरा भागातील मुख्य रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आल्याने, या मार्गावरील रहदारीला
नागपूर : मोमीनपुरा भागातील मुख्य रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आल्याने, या मार्गावरील रहदारीला अडथळा निर्माण झाला होता. यासंदर्भात नागरिक व व्यापाऱ्यांच्या तक्रारी होत्या. परंतु अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जात नव्हती. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने अखेर सोमवारी प्रचंड पोलीस बंदोबस्तात येथील ५५ अतिक्रमण हटविले.
भगवाघर चौक ते बोरियापुरा दरम्यानच्या मार्गावर दुकानदारांनी अस्थायी शेड उभारले होते. त्यामुळे हा मार्ग अरुंद झाला होता. पथकाने सहायक आयुक्त अशोक पाटील, तहसील पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर व प्रवर्तन विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.
भगवाघर चौकापासून अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर गुप्ता हॉटेल ते मोमीनपुरा गेट येथील अतिक्रमण हटविण्यात आले. बाजूच्या डेकोरेशन व्यावसायिकाला शेड काढण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर मोहम्मद अली सराय समोरील एमएलए कॅन्टीनसमोरील शेड काढण्यात आले. जेसीबीच्या साह्याने सिमेंटचे ओटे तोडण्यात आले. तसेच हाफीज बेकरी, बब्बू हॉटेल, हैदराबाद चिकन सेंटर येथील २० शेड हटविण्यात आले. सायंकाळपर्यत ५५ अतिक्रमण हटविण्यात आले होते.(प्रतिनिधी)
भंगार व्यावसायिकांना तंबी
रेल्वे स्टेशन ते मोतीबाग पुलादरम्यानच्या मार्गावर भंगार विक्रेत्यांनी अतिक्रमण केलेले आहे. भंगारातील वाहने रस्त्याच्या कडेला उभी ठेवल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होतो. या भंगार विक्रे त्यांना अतिक्रमण हटविण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. अतिक्रमण न हटविल्यास भंगार जप्त करण्याची तंबी देण्यात आली आहे.