हिंगण्यात बहुचर्चित एलपीके-९ चे अतिक्रमण जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2020 11:29 PM2020-11-06T23:29:56+5:302020-11-06T23:32:14+5:30
Encroachment of much talked about LPK-9 destroyed गुन्हेगारांसोबत त्यांचे अवैध अड्डे आणि संपत्ती नष्ट करण्याच्या कामात लागलेल्या गुन्हे शाखेने हिंगणा येथील बहुचर्चित एलपीके-९ हॉटेलचे अवैध बांधकाम जमीनदोस्त केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हेगारांसोबत त्यांचे अवैध अड्डे आणि संपत्ती नष्ट करण्याच्या कामात लागलेल्या गुन्हे शाखेने हिंगणा येथील बहुचर्चित एलपीके-९ हॉटेलचे अवैध बांधकाम जमीनदोस्त केले आहे. कुख्यात संतोष आंबेकर आणि साहिल सय्यदच्या बंगल्यानंतर गुन्हे शाखेने तोडलेले हे तिसरे बांधकाम आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.
हिंगणा ठाण्यांतर्गत अनेक दिवसांपासून एलपीके हॉटेल सुरू होते. या जमिनीचा मूळ मालक मुस्तफा अली महसूद हसन, कुर्बान हसन जरीवाला आणि आरिफ अख्तर शाबीर आहे. त्यांच्याकडून लाहोरी बारचे संचालक समीर शर्मा आणि लालचंद मोटवानी यांनी जमीन किरायाने घेतली होती. समीरने येथे हॉटेल एलपीके-९ (लव्ह पॅशन-कर्मा) उघडले होते. येथे हुक्का पार्लरसह पार्ट्या आयोजित करण्यात येत होत्या. कृषी जमिनीचा व्यावसायिक वापर सुरू होता. बांधकामासाठीही कोणाचीच परवानगी घेण्यात आली नव्हती. काही दिवसांपासून समीर शर्मा पोलिसांच्या नजरेत आला होता. दोन महिन्यांपूर्वी पोलिसांनी एलपीकेवर धाड टाकून कारवाईसुद्धा केली होती. त्यानंतर समीर आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध कोराडी ठाण्यात जमीन बळकावल्याचा गुन्हा दाखल केला होता. मागील १५ दिवसात दोन वेळा त्याच्या धरमपेठ येथील हुक्का पार्लरवर कारवाई करण्यात आली. गुन्हेगारी वृत्तीचा असूनही समीर शांत न झाल्यामुळे पोलीसही त्रस्त झाले होते. पोलिसांना एलपीके-९ अवैधरीत्या संचालित होत असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेने एनएमआरडीएला समीरच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती देऊन एलपीकेचे बांधकाम तोडण्याची शिफारस केली. त्या आधारे एनएमआरडीएने बांधकाम तोडण्याचा आदेश दिला. शुक्रवारी सकाळी १० वाजता गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने, सहायक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे, गणेश पवार आणि हिंगणा पोलिसांच्या उपस्थितीत अतिक्रमण तोडण्यात आले. जमिनीवर शेड, खोल्या, हॉल, किचनचे बांधकाम करण्यात आले होते. बुलडोझरच्या मदतीने अतिक्रमण तोडण्यात आले. सायंकाळी ६ पर्यंत सुरू असलेल्या या मोहिमेत संपूर्ण बांधकाम पाडण्यात आले. गुन्हे शाखेच्या शिफारशीवरून यापूर्वी आंबेकर आणि साहिल सय्यदचा बंगला पाडण्यात आला होता.
ढाब्यावर जमते मैफल
हिंगणा ठाण्यांतर्गत पोलीस विभागाशी निगडित एका व्यक्तीचा आलिशान ढाबा आहे. हा ढाबा नेहमीच चर्चेत असतो. पोलीस विभागाशी निगडित व्यक्तीने जमीन खरेदी करण्यासाठी शहरातील एका प्रॉपर्टी डीलरकडून पैसे उसने घेतले होते. प्रॉपर्टी डीलरने फसवणूक केल्याची तक्रारही दाखल केली आहे. हा व्यक्ती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाखाली नागरिकांना प्रभावित करतो. त्याच्या हॉटेलमध्ये संशयित नागरिकांची ये-जा असते. पोलीस विभागातील अनेक अधिकारी व नेत्यांची या ढाब्यावर मैफिल भरते. या हॉटेलकडे स्थानिक पोलिसही दुर्लक्ष करतात. यामुळे या प्रकरणाचा बारकाईने तपास करण्याची मागणी होत आहे.
गुन्हेगारांना धडा शिकविणे गरजेचे
गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांनी सांगितले की, गुंडागर्दीच्या आधारे गुन्हेगार संपत्ती गोळा करतात. ते पाहून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. अशा लोकांना धडा शिकविण्यासाठी त्यांचे बांधकाम तोडणे गरजेचे आहे. कायदा सर्वांसाठी सारखा आहे. गुन्हेगार आणि अवैध धंद्यांना शहरात काहीच स्थान नाही. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या निर्देशानुसार गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यात येईल. नागरिक अवैध धंदे, गुन्हेगारांची माहिती बिनधास्तपणे पोलिसांना देऊ शकतात. ही माहिती देणाऱ्या नागरिकांचे नावही गुप्त ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.