राज्यातील ६१ हजार हेक्टर वनक्षेत्रावर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 01:28 AM2018-07-29T01:28:36+5:302018-07-29T01:29:42+5:30

प्रशासकीय अनास्थेमुळे सरकारी जागांवर होत असलेले अतिक्रमण वाढत असल्याचे दिसून येते. राज्याच्या वनक्षेत्रालादेखील अतिक्रमणाने ग्रासले असून थोडेथोडके नव्हे तर ६१ हजार हेक्टरहून अधिक वनक्षेत्रावर अतिक्रमण झालेले आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

Encroachment over 61 thousand hectares of forest in the state | राज्यातील ६१ हजार हेक्टर वनक्षेत्रावर अतिक्रमण

राज्यातील ६१ हजार हेक्टर वनक्षेत्रावर अतिक्रमण

Next
ठळक मुद्देसर्वाधिक अतिक्रमण धुळ्यात : वनक्षेत्राला अतिक्रमणाने ग्रासले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रशासकीय अनास्थेमुळे सरकारी जागांवर होत असलेले अतिक्रमण वाढत असल्याचे दिसून येते. राज्याच्या वनक्षेत्रालादेखील अतिक्रमणाने ग्रासले असून थोडेथोडके नव्हे तर ६१ हजार हेक्टरहून अधिक वनक्षेत्रावर अतिक्रमण झालेले आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडे विचारणा केली होती. राज्यातील किती वनक्षेत्रावर अतिक्रमण आहे, किती वर्षांपासून अतिक्रमण आहे, तसेच २०१८ मध्ये किती प्रमाणात अतिक्रमण हटविण्यात आले, इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार वनविभागातील एकूण वनक्षेत्रापैकी ६१,७८०.२३३ हेक्टर वनक्षेत्रावर अतिक्रमण झाले आहे. यातील सर्वाधिक वनक्षेत्र हे वनविभागाच्या अंतर्गत येते. उर्वरित अतिक्रमण हे महसूल विभाग, राज्य वनविकास महामंडळ तसेच वनविभागाच्या अधिपत्याखाली आलेल्या खासगी वनांच्या क्षेत्रावर झालेले आहे.
१९७८ नंतर राज्यातील वनजमिनींवर झालेल्या अतिक्रमणापैकी ९३८.१९६ हेक्टर अतिक्रमण जानेवारी ते मार्च २०१८ या कालावधीत हटविण्यात आले. राज्यातील सर्वात जास्त धुळे वनवृत्तात २०,९२५.१७० हेक्टर वनक्षेत्रावर अतिक्रमण आहे. त्याखालोखाल गडचिरोली (८,५८२.०४९ हेक्टर), औरंगाबाद (६,५८०.७६० हेक्टर), चंद्रपूर (५,२४९.११६ हेक्टर) यांचा क्रमांक लागतो.
नागपूर वनवृत्तात २,८०८.९५१ हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण झाले आहे.

तीन महिन्यांच्या कालावधीत सव्वाशे हेक्टर अतिक्रमण
जानेवारी ते मार्च २०१८ या तीन महिन्यांच्या कालावधीत राज्यातील १३०.३५८ हेक्टर वनक्षेत्रावर अतिक्रमणदेखील झाले. धुळे जिल्ह्यात सर्वाधिक ३३.९६१ हेक्टर वनक्षेत्रावर २३ अतिक्रमणे झाली. तर चंद्रपूर जिल्ह्यातील ३२.०९९ हेक्टर वनक्षेत्रात १६ अतिक्रमणे झाली. ठाणे येथे १४.८०८ हेक्टर वनक्षेत्रावर एकूण ७५९ अतिक्रमणे झाली.

राज्यात २० टक्के वनक्षेत्र
राज्यात सद्यस्थितीला ६१ हजार ७२३ चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र आहे. राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत हे प्रमाण २०.०६ टक्के इतके आहे. सर्वाधिक ५५,४३३.२५ चौरस किमी वनक्षेत्र हे वनविभागाच्या अधिपत्याखाली आहे. तर महसूल विभाग (०.५१ %), महाराष्ट्र वन विकास महामंडळ (१.१५ %) व वनविभागाच्या अधिपत्याखाली येणारी खासगी वने (०.३८ %) यांच्या अंतर्गत उर्वरित वनक्षेत्र येते.

सर्वाधिक वनक्षेत्रावर अतिक्रमण
वनवृत्त                  अतिक्रमण (हेक्टरमध्ये)
धुळे                        २०,९२५.१७०
गडचिरोली            ८,५८२.०४९
औरंगाबाद            ६,५८०.७६०
मुंबई                    ५,९३३.६४४
चंद्रपूर                 ५,२४९.११६
नाशिक                ३,८११.५७८
नागपूर               २,८०८.९५१

 

Web Title: Encroachment over 61 thousand hectares of forest in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.