अजनीतील मैदानांवर अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:09 AM2021-02-17T04:09:59+5:302021-02-17T04:09:59+5:30
नागपूर : एकीकडे अजनीवनातील झाडांचा बळी घेतला जात आहे, तर दुसरीकडे या भागातील मैदानावरही संकट आणले जात आहे. अजनी ...
नागपूर : एकीकडे अजनीवनातील झाडांचा बळी घेतला जात आहे, तर दुसरीकडे या भागातील मैदानावरही संकट आणले जात आहे. अजनी काॅलनीतील एका एका मैदानावर अवैध कब्जा करून ही जागा घशात घातली जात आहे. त्यामुळे मुलांसाठी खेळण्याच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला असून, त्यांना रस्त्यावर खेळण्याची पाळी आली आहे. ही मैदाने वाचविण्यासाठी तरुणांनी खेळांच्या आयाेजनाच्या माध्यमातून अभियान छेडले आहे.
रेल्वे काॅलनी परिसरात डिसीए मैदानासह अविनाश ग्राउंड, उर्दू शाळेचे मैदान, इन्स्टिट्यूटचे मैदान, एक क्रिकेट ग्राउंड व डिसीएजवळचे मैदान आदी मैदाने आहेत. काॅलनी वसली तेव्हा येथे एकही मैदान नव्हते. डिसीए वगळता सारे मैदान येथे वास्तव्यास असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मुलांनी परिश्रम घेऊन खेळण्यायाेग्य तयार केले आहे. यातील इन्स्टिट्यूटच्या मैदानावर तर कधीकाळी भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धाेनी हा सुद्धा खेळला आहे. मात्र या मैदानांचे अस्तित्व राहणार की नाही, ही चिंता येथील तरुणांना आहे.
येथील उर्दू शाळेचे मैदान एका कंपनीने बळकावले आहे. ही कंपनी स्पेअर पार्ट्स तयार करण्याचे काम करीत असल्याचे सांगण्यात येते. इन्स्टिट्यूटच्या मैदानाबाबतही हीच शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसऱ्या एका मैदानाच्या बाजूला अजनीवनातील कर्मचाऱ्यांसाठी क्वार्टर्सचे बांधकाम केले जात आहे. आयएमएस प्रकल्पासाठी हा संपूर्ण परिसरात ताब्यात घेतला जाणार असल्याने खेळण्यासाठी मैदाने राहणार की नाही, सांगता येत नाही. मुलांच्या इच्छा व परिश्रमाकडे दुर्लक्ष करून रेल्वे प्रशासन नवीन याेजनेत मैदानांचाही बळी देत असल्याचा आराेप हाेत आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या तरुणांनी आपल्या पद्धतीचे अभियान चालविले आहे. तरुणांनी मैदानाचे महत्त्व अधाेरेखित करण्यासाठी या मैदानांवर विविध खेळांचे आयाेजन केले जात आहे. नुकतेच येथील एका मैदानात फुटबाॅल टुर्नामेंटचे आयाेजन करण्यात आले. शहरातील विविध भागातून आलेल्या खेळाडूंना मैदान वाचविण्याचे आवाहन करण्यात आले. जावेद खान, नीलेश मेश्राम, राकेश खाटरकर, निखिल गायकवाड, राहुल मरसकाेल्हे, राेहित काथाेटे, सुमित यादव, नवीन मश्राम, आमीर अंजूम, दानिश शेख, अखिल खान, राेनाल्ड रामपुरे आदी तरुणांनी हे अभियान राबविले आहे. लवकरच हाॅकी टुर्नामेंटचे आयाेजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.