राजभवन परिसरातील अतिक्रमण हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:12 AM2021-09-15T04:12:00+5:302021-09-15T04:12:00+5:30
मनपाच्या पथकाची कारवाई : फूटपाथवरील नर्सरीचे अतिक्रमण काढले लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यपाल नागपूर दौऱ्यावर येत असल्याने महापालिकेच्या ...
मनपाच्या पथकाची कारवाई : फूटपाथवरील नर्सरीचे अतिक्रमण काढले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यपाल नागपूर दौऱ्यावर येत असल्याने महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या पथकाने मंगळवारी राजभवन परिसरातील व सदरकडील मुख्य प्रवेशव्दार परिसरातील अतिक्रमण हटविले.
धरमपेठ झोन क्षेत्रातील अलंकार टॉकिज परिसरातील फूटपाथवरील नर्सरीचे अतिक्रमण हटविले. तसेच अलंकार टॉकीज ते दीक्षाभूमी, काचीपुरा ते रामनगर, इंदिरा गांधी रुग्णालय ते गांधी नगर रस्त्यांच्या फूटपाथवरील अतिक्रमण हटविले.
सिव्हील लाईन भागातील उच्च न्यायालयालगतच्या राज्य वस्तू व सेवाकर कार्यालय परिसरातील चहा व नाश्ता विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवून परिसर मोकळा करण्यात आला.
आसीनगर झोन क्षेत्रातील झोन कार्यालय ते अशोक चौक ते महात्मा फुले शाळा, वैशाली नगर ते मेहंदी बाग कॉर्नर ते दुर्गावती चौक ते चांभार नाला परिसरातील फूटपाथवरील अतिक्रमण काढण्यात आले.
धंतोली झोनच्या पथकाने मेडिकल चौक ते अजनी चौक, बैद्यनाथ चौक परिसरातील रस्त्यांच्या दोन्ही बाजूच्या फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात आले. पथकाने ३८ अतिक्रमण हटवून एक ट्रक साहित्य जप्त केले. ही कारवाई प्रवर्तन विभागाचे उपायुक्त अशोक पाटील, निरीक्षक संजय कांबळे यांचे मार्गदर्शनात नरेंद्र नोटेवार व पथकाने केली.