नागपुरात मेडिकलच्या सहा एकर जागेवर अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 01:28 AM2018-10-28T01:28:50+5:302018-10-28T01:29:48+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) सहा एकर जागेवर सुमारे २५ वर्षांपासून अतिक्रमण आहे. व्यापारी संकुलापासून ते हातठेलेवाल्यांनी रुग्णालयासमोरील फुटपाथही ‘हायजॅक’ केला आहे. रुग्णांना येण्या-जाण्यापासून ते इतर सोयी मिळण्यास अडचणीचे जात आहे. मात्र, प्रशासनाचे अद्यापही याकडे लक्ष नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) सहा एकर जागेवर सुमारे २५ वर्षांपासून अतिक्रमण आहे. व्यापारी संकुलापासून ते हातठेलेवाल्यांनी रुग्णालयासमोरील फुटपाथही ‘हायजॅक’ केला आहे. रुग्णांना येण्या-जाण्यापासून ते इतर सोयी मिळण्यास अडचणीचे जात आहे. मात्र, प्रशासनाचे अद्यापही याकडे लक्ष नाही.
मेडिकल प्रशासनाला पहिल्यांदाच २११.६ एकर जमीन असल्याचा साक्षात्कार २०१६ मध्ये झाला. त्या आधारे जमिनीची प्राथमिक स्वरूपात मोजमाप करण्यात आले. यात साधारण सहा एकर जागेवर अतिक्रमण असल्याचे समोर आले. हे अतिक्रमण मेडिकलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ साधारण शंभरावर विविध खाद्यपदार्थांच्या हातठेल्यांचे, टीबी वॉर्डाच्या परिसरात मटन मार्केट व धोबीघाटाचे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटललगत असलेल्या जागेवर व्यापारी संकुल असल्याचे समोर आले आहे.
हातठेल्यांपासून ते धोबीघाटाचे अतिक्रमण
मेडिकलच्या मुख्य प्रवेशद्वारावर शंभरावर फळ, खाद्यपदार्थांच्या हातठेल्यांनी मोठी जागा व्यापली आहे. यामुळे रुग्णांना रुग्णालयात येताना अडचणीचे जाते. अनेक वेळा चारचाकी वाहनांसाठी जागाही अपुरी पडते. रुग्णालयापासून काही अंतरावर असलेल्या मटन मार्केट व धोबीघाटानेही अतिक्रमण केले आहे. सूत्रानुसार, मेडिकल प्रशासनाने या अतिक्रमणाच्या संदर्भात संबंधित विभागाला माहिती दिली आहे, परंतु अद्यापही कारवाई नाही.
या परिसरात झाले अतिक्रमण
- मेडिकलच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर शंभरच्यावर हातठेल्यांचे अतिक्रमण.
- टीबी वॉर्डाच्या परिसरात मटन मार्केटचे अतिक्रमण
- टीबी वॉर्डाच्या परिसरात धोबीघाटाचे अतिक्रमण
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटललगत व्यापारी संकुलाचे अतिक्रमण