अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 11:49 PM2019-03-02T23:49:42+5:302019-03-02T23:50:18+5:30
न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेतर्फे शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. परंतु पथकाने कारवाई केल्यानंतरही ठिकठिकाणी अनधिकृ त धार्मिक स्थळांचे अतिक्रमण अजूनही कायम आहे. अशा धार्मिक स्थळांच्या ठिकाणी आता पुन्हा पूजाअर्चा सुरू झाली आहे. असे असूनही महापालिका प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. मागील काही महिन्यापूर्वी करण्यात आलेल्या कारवाईचा अनधिकृत धार्मिक स्थळांवर फारसा परिणाम झालेला दिसत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेतर्फे शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. परंतु पथकाने कारवाई केल्यानंतरही ठिकठिकाणी अनधिकृ त धार्मिक स्थळांचे अतिक्रमण अजूनही कायम आहे. अशा धार्मिक स्थळांच्या ठिकाणी आता पुन्हा पूजाअर्चा सुरू झाली आहे. असे असूनही महापालिका प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. मागील काही महिन्यापूर्वी करण्यात आलेल्या कारवाईचा अनधिकृत धार्मिक स्थळांवर फारसा परिणाम झालेला दिसत नाही.
आता ठेले, दुकानांचा ताबा
महापालिकेतर्फे कारवाई करण्यात आलेल्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी दुकाने, ठेले व फे रीवाल्यांनी ताबा केला आहे. गांधीबाग, इतवारी, महाल, कमाल चौक, सदर यासह शहरातील विविध भागात अशी परिस्थिती आहे. महापालिका प्रशासनानेही याला स्वीकृती दिली आहे. मात्र प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे. अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यात आल्यानंतर अनेक ठिकाणी अजूनही मलबा तसाच पडून आहे. याचा फायदा घेत अशा धार्मिक स्थळांचे अतिक्रमण पुन्हा वाढले आहे. यातून अतिक्रमण करण्याला प्रोत्साहन मिळत आहे.
अतिक्रमण वाढले
गांधीबाग येथील डागा रुग्णालय मार्गावरील चिंचेचे झाड असलेल्या चौकातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटिवण्यात आले होते. काही लोकांनी या कारवाईला विरोध केला होता. परंतु महापालिका प्रशासनाने अतिक्रमण हटविले होते. परंतु येथे मलबा अजूनही पडून आहे. यामुळे अनधिकृत धार्मिक स्थळाचे अतिक्रमण पुन्हा निर्माण झाले आहे. येथे धार्मिक विधी पुन्हा सुरू झाल्या आहेत. आधीच्या तुलनेत अतिक्रमण वाढले आहे.
अतिक्रमण हटविण्याचा उपयोग नाही
गांधीबाग उद्यानासमोरील धार्मिक स्थळाचे अतिक्रमण हटविण्याला विरोध झाला होता. परंतु विरोधाला न जुमानता धार्मिक स्थळ हटविण्यात आले. परंतु मलबा अजूनही पडून आहे. नागरिकांनी पुन्हा पूजाअर्चा सुरू केली आहे. छिंदवाडा मार्गावरील पागलखाना चौका नजिकच्या फूटपाथवरील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्यात आले होते. ते पुन्हा उभारण्यात आले आहे. धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविताना ठिकठिकाणी अर्धवट बांधकाम तसेच आहे. यातील सळाकी बाहेर निघाल्या आहेत. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
मलबा उचलणार
न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केली जात आहे. अतिक्रमण हटविलेल्या ठिकाणी दुकाने व फेरीवाल्यानी पुन्हा अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले आहे. यावर कारवाई केली जात आहे. काही धार्मिक स्थळांचे अतिक्रमण वाढले आहे. ते पुन्हा हटविण्यात येईल.
अशोक पाटील, सहायक आयुक्त, प्रवर्तन विभाग मनपा