अतिक्रमण, अस्वच्छतेमुळे नागपूरचा श्वास गुदमरतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 10:58 AM2020-01-04T10:58:20+5:302020-01-04T11:01:42+5:30

नागपूर शहराच्या सर्वच भागात अतिक्रमणाचा विळखा आहे. अतिक्रमणामुळे एकही फूटपाथ मोकळा नाही. कचरा संकलनात अजूनही अनेकांना ओला-सुका कचऱ्याच्या वर्गीकरणाचे भान नाही.

The encroachment, the uncleanness, Nagpur's breath is quenching | अतिक्रमण, अस्वच्छतेमुळे नागपूरचा श्वास गुदमरतोय

अतिक्रमण, अस्वच्छतेमुळे नागपूरचा श्वास गुदमरतोय

googlenewsNext
ठळक मुद्दे फूटपाथही चालण्यायोग्य नाहीतउत्तम नागरी सुविधा हव्या तर मानसिकताही बदलवा!

गणेश हुड।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘स्वच्छ व सुंदर नागपूर’ हा नारा अमलात आणायचा असेल तर नागरिकांना मानसिकता बदलावी लागेल. शहराच्या सर्वच भागात अतिक्रमणाचा विळखा आहे. अतिक्रमणामुळे एकही फूटपाथ मोकळा नाही. कचरा संकलनात अजूनही अनेकांना ओला-सुका कचऱ्याच्या वर्गीकरणाचे भान नाही. सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग अद्यापही दिसतच आहेत. मात्र आता स्वच्छ व सुंदर नागपूरसाठी नागरिकांना बदलावेच लागणार आहे.
मानकानुसार फूटपाथचे बांधकाम होत नसल्याने फूटपाथ असले तरी ते चालण्यायोग्य नाही. त्यामुळे नागरिक रस्त्यांवरून चालतात. वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी नागरिकांनी फूटपाथवरून चालणे अपेक्षित आहे. पदपथांबाबतीत इंडियन रोड काँग्रेसने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचेही सर्रास उल्लंघन होत आहे.

नकाशातील पार्किंग जागेवर अतिक्रमण
शहरात रुग्णालय, मंगल कार्यालये आणि इमारतींमध्ये मंजूर पार्किंग जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. रुग्णालयांनी पार्किंगच्या जागेवर जनरेटर रुम, स्टोर रुम, जनरल वॉर्ड, स्टाफ रुम तयार केल्या आहेत. मंगल कार्यालये आणि इमारतींमध्येही पार्किंग ठिकाणी अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यांवर वाहने उभी करावी लागतात.

अनधिकृत मंदिरांच्या धर्तीवर कारवाई व्हावी
शहरातील फूटपाथ पादचाऱ्यांसाठी आहेत. त्यावर एकही अतिक्रमण नको, अशी शहरातील नागरिकांची अपेक्षा आहे. महापालिका आयुक्तांनी व महापौरांनी वेळोवेळी फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले. परंतु शहरातील फूटपाथवरील अतिक्रमणाची समस्या कायम आहे. यासाठी ठोस व धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार नागपूर शहरातील अनधिकृत मंदिरांचे बांधकाम हटविण्यात आले. यासाठी मोहीम राबविण्यात आली. त्याच धर्तीवर शहरातील प्रमुख मार्गावरील अतिक्रमण हटविण्यासाठी मोहीम राबविण्याची गरज आहे.

अतिक्रमणामुळे नागरिकांना फूटपाथवरून चालता येत नाही. फूटपाथ चालण्यासाठी मोकळे करू. फेरीवाल्यांना स्मार्ट स्टॉल उपलब्ध केले जातील. १ जानेवारीपासून शहरातील पेट्रोल पंपावरील शौचालय खुले केले जातील. शहरात विविध भागात १०० शौचालये उभारण्यात येतील. मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी व्यापक नसबंदी कार्यक्रम राबविला जाईल. नागरिकांच्या तक्रारी ऐकल्या जाव्यात, अशी सक्षम यंत्रणा निर्माण केली जाईल.
- संदीप जोशी, महापौर

कचरा संकलनात सुधारणा व्हावी
शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी एजी एन्व्हायरो व बीव्हीजी इंडिया या कंपन्यांवर सोपविण्यात झाली. या दोन्ही कंपन्यांनी १६ नोव्हेंबरपासून शहरातील कचरा संकलनाला सुरुवात केली. मात्र अद्याप कचऱ्याची समस्या पूर्णपणे सुटलेली नाही.
महापालिका प्रशासनाकडून स्वच्छतेसाठी प्रयत्न सुरू आहेत. शहरात दररोज १२०० मेट्रिक टन कचरा निघतो. कचरा संकलनात सुधारणा व्हावी, यासाठी दोन एजन्सी नियुक्त करण्यात आल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यात शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे लागले होते. यात हळूहळू सुधारणा होत आहे. प्रशासन कामाला लागले आहे. अजूनही कचरा संकलनाची गाडी रुळावर आलेली नाही. यासाठी नागरिकांचा प्रतिसाद तितकाच महत्त्वाचा आहे. वारंवार आवाहन केल्यानंतरही नागरिक ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करीत नाहीत. फलक लावूनदेखील कचरागाडीत कचरा न टाकता सार्वजनिक जागेवर कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत.

Web Title: The encroachment, the uncleanness, Nagpur's breath is quenching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.