सक्रियता संपली की मृत्यू अटळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 01:33 AM2017-10-29T01:33:09+5:302017-10-29T01:33:22+5:30
आधुनिक जीवनशैली, अनियमित खानपान, मानसिक ताण आणि व्यायामाकडे दुर्लक्षामुळे लोकांमध्ये आजार बळावत आहेत. या आजाराला ‘सायको सोमेटिक डिसआॅर्डर’ही म्हटले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आधुनिक जीवनशैली, अनियमित खानपान, मानसिक ताण आणि व्यायामाकडे दुर्लक्षामुळे लोकांमध्ये आजार बळावत आहेत. या आजाराला ‘सायको सोमेटिक डिसआॅर्डर’ही म्हटले जाते. जेव्हापर्यंत आम्ही सक्रिय आहोत तोपर्यंतच आमचे आयुष्य कायम आहे. सक्रियता संपली की मृत्यू अटळ आहे, अशा शब्दात आरोग्याप्रति जागरूकता बाळगण्याचे आवाहन बेंगळूरु येथील होलिस्टिक लाईफ केअरचे विश्वस्त व सीईओ डॉ. अल्ताफ उर रहमान यांनी केले. शनिवारी नागपुरात समी डायरेक्ट कंपनीद्वारे आयोजित एका कार्यक्रमासाठी आले असता ते लोकमतशी बोलत होते.
डॉ. रहमान पुढे म्हणाले, आवश्यक व वेळेवर झोप, व्यायाम आणि संतुलित आहार जर आमच्या जीवनाचा भाग नसेल तर आम्हाला वात, पित्त आणि कफचा त्रास होऊ शकतो. नॅचरोपॅथीला ओळख मिळवून देण्यासाठी सीताराम जिंदल यांनी पुढाकार घेतला होता. यांनी केंद्रीय योग व प्राकृतिक चिकित्सा अनुसंधान परिषदेच्या विकासासाठी मोठे कार्य केले. एज्युकेटिव्ह, प्रिंव्हेटिव्ह आणि क्युरेटिव्ह हा आयुर्वेदचा मूळ सिद्धांत आहे. परंतु फक्त क्युरेटिव्हलाच लक्षात घेतले जाते. यामुळे आयुर्वेदच्या विश्वसनीयतेचा आलेख खाली येतोय. भारतीय उपचार पद्धतींतर्गत केल्या जाणाºया उपचाराला विशेष कम्युनिटीशी जोडण्यात आले आहे, जे चुकीचे आहे. मागच्या काही वर्षात नैसर्गिक उपचार पद्धतीबाबत सकारात्मकता वाढत आहे. देशातील अनेक राज्यात यावर विशेष लक्ष दिले जात आहे. महाराष्ट्रातील पुण्यात नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ नॅचरोपॅथी येथेही या विषयावर संशोधन सुरू आहे.
आयुर्वेद सांगतो, मनुष्याच्या शरीरात सात धातू असतात- यात रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्रचा समावेश आहे. यामुळेच शरीर सुदृढ बनते. या धातूंचे शरीरातील संतुलन बिघडले तर अनुत्साह जाणवतो. रात्री झोपेसाठी ११ ते ३ ही योग्य वेळ आहे. यानंतर विसर्जनाची प्रक्रिया सुरू होते. या बाबीकडे लोकांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आज समाज आणि कुटुंबातील आध्यात्मिकता संपत चालली आहे. परोपकारी जीवनापासून लोक परावृत्त होत आहेत. आजारांचे एक मुख्य कारण हेसुद्धा आहे, याकडेही त्यांनी आवर्जून लक्ष वेधले.
जीवनातून नकारात्मकता घालवा
कुणाकडून फार अपेक्षा ठेवू नका
आवश्यक तेवढी आणि शांततापूर्ण झोप घ्या
शारीरिक सक्रियेतेकडे लक्ष द्या. आठवड्यातून पाच दिवस रोज ४० ते ४५ मिनिट पायी चालणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे. मैदानी खेळ आणि पोहणेही फायद्याचे ठरू शकते.
संतुलित भोजन वेळेवर घ्या, ज्यात डायटचा ५० टक्के भाग नाश्त्याच्या स्वरूपात हवा. जेवण आणि झोप यात दोन तासांचे अंतर हवे. वयाच्या चाळिशीनंतर रात्रीच्या जेवणात हलका आहार घ्या.
नैसर्गिक उपचार पद्धती म्हणजे काय?
नैसर्गिक उपचार पद्धतीची चुकीची व्याख्या करण्यात आली आहे. ही अशी उपचार पद्धती आहे ज्यात पहिल्या टप्प्यात हे सुनिश्चित केले जाते की शरीरातून विषाक्त पदार्थ कसे बाहेर काढता येतील. दुसºया टप्प्यात विषाक्त पदार्थामुळे अशक्त झालेल्या भागात नव्याने प्राण फुंकण्यासोबतच कार्यक्षमता वाढविण्यावर भर दिला जातो. तिसºया टप्प्यात पुनर्निर्माणाचे कार्य सुरू होते. ज्यात रोग प्रतिरोधकता क्षमता वाढून शरीर आणखी मजबूत बनते. ही उपचार पद्धती खूप स्वस्तही आहे.