नागपुरात सिलिंग फॅन पडून दोन महिन्यांच्या बालिकेचा अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 01:52 PM2018-05-08T13:52:37+5:302018-05-08T13:52:46+5:30
नेत्राला जन्म घेऊन अवघे दोनच महिने झाले होते. सोमवारी सायंकाळी ती तिच्या घरातील बेडवर निद्रीस्त होती. अचानक सिलींग फॅन तिच्या अंगावर पडला अन् गंभीर जखमी झालेली नेत्रा नंतर कायमचीच निद्रीस्त झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नेत्राला जन्म घेऊन अवघे दोनच महिने झाले होते. काय आहे, काय नाही हे बघण्याची, समजण्याची तिला नीट दृष्टीही आली नव्हती. जन्मदात्रीच्या कुशीतच तिचे विश्व होते. दिवसातील बराचसा वेळ नेत्रा निद्रिस्तच राहायची. सोमवारी सायंकाळी ती तिच्या घरातील बेडवर निद्रीस्त होती. अचानक सिलींग फॅन तिच्या अंगावर पडला अन् गंभीर जखमी झालेली नेत्रा नंतर कायमचीच निद्रीस्त झाली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही करुणाजनक घटना घडली.
गणेश वाडेकर हे खरबीतील डायमंडनगरात राहतात. ते एका ट्रान्सपोर्ट कार्यालयात काम करतात. दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्या पत्नीने एका गोंडस कन्येला जन्म दिला. वाडेकर कुटुंबीयांनी तिचे नाव नेत्रा ठेवले. आजुबाजूला काय आहे, कोण आहेत, याची अद्याप नेत्राला जाणीवच नव्हती. आईच्या कुशीतच तिचे जग. नेत्राची आईदेखील तिला जिवापाड जपायचा प्रयत्न करायची. घरातील आवश्यक कामे करून ती नेत्राला सारखी कुशीतच घेऊन राहायची. सोमवारी असेच झाले. सायंकाळी ५.१५ च्या सुमारास नेत्रा निद्रीस्त असल्याने तिला बिछान्यावर ठेवून तिची आई दैनंदिन कामात व्यस्त झाली. अचानक काही तरी पडल्याचा आणि त्याबरोबरच चिमुकल्या नेत्राच्या रडण्याचा आईला आवाज आला. ती धावतच घरात आली. नेत्राच्या अंगावर सिलींग फॅन पडला होता. आईने कसा बसा तो बाजूला फेकून नेत्राला छातीशी कवटाळले. ती निपचित झाली होती. धावपळ सुरू झाली. गणेश वाडेकर आले. त्यांनी नेत्राला प्रारंभी बाजूच्या डॉक्टरकडे नेले. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी नेत्राला बालकांच्या इस्पितळात नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, वाडेकर दाम्पत्य आणि त्यांच्या स्वकियांनी नेत्राला चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये नेले. तेथील डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. चिमुकलीचा असा आकस्मिक मृत्यू झाल्याने परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. नंदनवन पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.