सरकार फडणवीस यांचे, कॉफी टेबल बुक राऊत यांच्यावर; महापारेषणचे अजब फरमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2022 10:56 AM2022-08-31T10:56:53+5:302022-08-31T11:00:46+5:30
अन्य वीज कंपन्यांकडून मागितली माहिती
कमल शर्मा
नागपूर : राज्याचे ऊर्जा खाते सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांभाळत आहेत. परंतु वीज कंपन्या माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावर कॉफी टेबल बुक प्रकाशित करीत आहे. आतापर्यंत हे निश्चित झाले नाही की यावर किती खर्च होणार आहे? खर्चाची जबाबदारी कोण उचलणार आहे?
पण हे सर्व होत आहे, महापारेषणचे संचालक (मानव संसाधन) गमरे यांच्या पत्रावर १ ऑगस्टला हे पत्र महावितरण, महाजेनको व महाऊर्जाच्या मानव संसाधन संचालक व जनसंपर्क अधिकाऱ्यांना लिहिले आहे. या पत्रात तत्कालीन ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या २० जूनच्या पत्राचा संदर्भ देत, सांगण्यात आले की, त्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळातील उल्लेखनीय कार्यावर कॉफी टेबल बुक प्रकाशित करायचे आहे. पत्रात म्हटले आहे की, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव यांच्या निर्देशानुसार या संदर्भातील फोटो, व्हिडिओ पाठविण्याची विनंती केली आहे. तीनही कंपन्यांनी यासंदर्भातील माहिती २२ ऑगस्टपर्यंत पाठविली आहे.
आता महापारेषण या माहितीचा संग्रह करून कॉफी टेबल बुक प्रकाशित करेल. तसे राऊत हेही कॉफी टेबल बुक वैयक्तिक स्तरावर प्रकाशित करू शकतात. मात्र जाणकारांचे म्हणणे आहे की, यासाठी वीज कंपन्यांची तत्परता आश्चर्यकारक वाटते आहे.
- संकलन सुरू आहे - गमरे
महापारेषणचे निदेशक सुगत गमरे म्हणाले की, राऊत यांच्या पत्रांवर माहिती मागविण्यात आली आहे. वीज कंपन्यांनी यासंदर्भात माहिती पाठविली आहे. माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. हे कॉफी टेबल बुक प्रकाशित करणे व यावर लागणारा निधी खर्च करण्यासंदर्भात ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव निर्णय घेईल.
- माजी मंत्र्यांच्या जवळच्यांच्या नियुक्तीसाठी प्रयत्न सुरू
कॉफी टेबल बुकसाठी होत असलेल्या प्रयत्नाबरोबरच महाजेनकोचे अतिरिक्त जनसंपर्क अधिकारी म्हणून माजी मंत्री यांच्या जवळच्या व्यक्तीच्या नियुक्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी योग्यतेचे मानक बदलविण्यात आले आहे. अनुभवाची मर्यादा ५ वरून २ वर्षे करण्यात आली आहे. कंपनीद्वारे जारी करण्यात आलेल्या पात्र लोकांच्या यादीमध्ये माजी मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीचे नाव देखील आहे. आता परीक्षा न घेता सरळ मुलाखतीच्या माध्यमातून नियुक्ती करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.