ऊर्जामंत्र्यांचा खापरखेडा औष्णिक केंद्राला ‘शॉक’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 01:24 AM2017-10-02T01:24:25+5:302017-10-02T01:24:37+5:30
राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी सायंकाळी खापरखेडा औष्णिक वीज केंद्राला अचानक भेट देऊन पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी सायंकाळी खापरखेडा औष्णिक वीज केंद्राला अचानक भेट देऊन पाहणी केली. यादरम्यान काही वरिष्ठ अधिकारीच गैरहजर असल्याचे आढळून आले. ऊर्जामंत्री आल्याचे माहिती होताच काही अधिकारी धावून आले. यावेळी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी अनेकांची कानउघाडणी केली.
खापरखेडा येथील औष्णिक वीज केंद्रातील अधिकारी कामावर येतात, सही करतात आणि निघून जातात, अशा अनेक तक्रारी ऊर्जामंत्री बावनकुळे यांना मिळाल्या होत्या. यासंदर्भात स्वत: शहानिशा करण्यासाठी रविवारी सायंकाळी ५ वाजता ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खापरखेडा वीज केंद्राला अचानक भेट दिली. ही बाब खरी असल्याचे निदर्शनास आले. यावेळी २१० मेगावॅट वीज केंद्राचे अधीक्षक अभियंता हेमंत रंगारी आणि ५०० मेगावॅट वीज केंद्रातील कोळसा हाताळणी विभागाचे उपमुख्य अभियंता राजेंद्र राऊत आणि अधीक्षक अभियंता रामटेके यांच्याव्यतिरिक्त एकही जबाबदार अधिकारी आढळून आला नाही. मुख्य अभियंता राजकुमार तासकर हे गैरहजर होते. त्यांचे कुलूप लागलेले कार्यालय उघडून ऊर्जामंत्री कार्यालयात बसले. विचारपूस केली असता तासकर हे नागपूरला नातेवाईकाच्या घरी कार्यक्रमात गेल्याचे समजले. त्यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा मुख्य अभियंता राजकुमार तासकर, उप मुख्य अभियंता प्रमोद फुलझेले कार्यालयात पोहोचले. वीज केंद्राची पाहणी करताना त्यांना अनेक त्रुटी आढळून आल्या. उप मुख्य अभियंता मनोहर खांडेकर यांच्याकडे २१० मेगावॅट वीज केंद्राच्या चारही संचांचा चार्ज आहे. वार्षिक देखभाल-दुरुस्तीचे काम सुरू असल्यावरही ते कर्तव्यावर हजर नसल्याचे आढळून आले. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु होऊ शकला नाही. खांडेकर हे शेवटपर्यंत आलेच नाही. अधिकाºयांच्या अशा वागणुकीबद्दल ऊर्जामंत्र्यांनी अधिकाºयांची कानउघाडणी केली. कार्यालयात राष्ट्रपती कोविंद यांचा फोटो दिसून आला नाही. यावरही कानउघाडणी करण्यात आली.रात्री ८ वाजेपर्यंत ही पाहणी सुरू होती. यानंतर स्थानिक नागरिकांची भेट घेतली. यावेळी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर राजीव पोतदार, संजय टेकाडे, सोनाबा मुसळे, वामन कुंभारे, श्यामराव सरोदे, किशोर खोरगडे, राधाकिशन मित्तल, गोपाल घोरमाडे, रमेश जैन, दिलीप ढगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दुरुस्तीचे काम एकाला, पाचवा व्यक्ती करतोय काम
येथील १, २, ३,४ हे २१० मेगावॅट वीज केंद्रातील चारही संच मागील अनेक दिवसांपासून तात्पुरते बंद करण्यात आले आहे. या ठिकाणी ४ नंबर युनिटचे वार्षिक देखभाल-दुरुस्तीचे काम सुरू असून, ते भेल कंपनीला देण्यात आले आहे. मात्र सदर कंपनीने दुसºयाच कंपनीला पेटी कंत्राट दिला आहे. त्या कंपनीने आणखी दुसºयाला काम दिले. अशाप्रकारे सध्या येथे पाचवा पेटी कंत्राटदार काम करीत असल्याचे ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या निदर्शनास आले. वास्तविक पाहता मूळ कंपनीला कंत्राट मिळाल्यावर त्या कंपनीने काम करणे अपेक्षित आहे. सदर बायलर ओवरायलिंगचे काम मूळ कंपनी सोडून दुसरीच कंपनी काम करीत असल्यामुळे गेटपास तयार झाल्या कशा, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. १३० कोटी रुपयांची तरतूद या कामासाठी करण्यात आली आहे. केंद्राला भेट दिली तेव्हा तेथील मस्टरवर २१ इंजिनियर, ८४ तंत्रज्ञ आणि १०७ मजूर आतमध्ये काम करीत असल्याची नोंद होती. परंतु आत खरंच इतके लोक काम करीत होते की नाही, याबाबत या भेटीत आढळून आलेल्या एकूण प्रकारामुळे शंका निर्माण झाली आहे.