स्क्रॅप पॉलिसीची सक्तीने अंमलबजावणी करा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:12 AM2021-09-08T04:12:01+5:302021-09-08T04:12:01+5:30
महापालिका आयुक्तांचे निर्देश : ‘आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस - स्वच्छ निळ्या आकाशासाठी' उत्साहात लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर ...
महापालिका आयुक्तांचे निर्देश : ‘आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस - स्वच्छ निळ्या आकाशासाठी' उत्साहात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरातील वाहन प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या स्क्रॅप पॉलिसीची सक्तीने अंमलबजावणी करा, असे निर्देश महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले.
महापालिकेतर्फे आयोजित 'आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस - स्वच्छ निळ्या आकाशासाठी' महापालिकेच्या सभागृहात उत्साहात पार पडला. हेल्दी एअर, हेल्दी प्लॅनेट' ही या वर्षीची संकल्पना आहे.
केंद्र सरकारने स्क्रॅप पॉलिसी घोषित केली आहे. त्यानुसार १५ वर्षे पूर्ण झालेली जुनी वाहने भंगारामध्ये टाकणे आवश्यक आहे. अशा वाहनांमुळे सर्वाधिक प्रदूषण होत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र शासनाने नवीन धोरण तयार केले आहे. याचा वापर केल्यास शासन जुन्या वाहनांवर बंदी घालू शकते, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे अशा वाहनांविरुद्ध मोठी कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे राधाकृष्णन बी. म्हणाले. जुन्या वाहनांचे प्रदूषण प्रमाणपत्र तपासण्यांचेसुद्धा निर्देश दिले. तसेच त्यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आयुक्तांच्या हस्ते राष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस बॅनरचे लोकार्पण करण्यात आले.
उपायुक्त विजय देशमुख, रवींद्र भेलावे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, वाहतूक अभियंता श्रीकांत देशपांडे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, टेरीचे संचालक सुनील पांडे, ‘व्हीएनआयटी’चे डॉ. दिलीप लटाये, पर्यावरण विभागाचे भीमराव राऊत, संदीप लोखंडे, सामाजिक कार्यकर्त्या लीना बुधे आणि अन्य उपस्थित होते.
..
१५ लाखांहून अधिक दुचाकी वाहने
नागपुरात १५ लाखांपेक्षा जास्त दुचाकी वाहन आहेत आणि दोन लाखांपेक्षा जास्त चारचाकी वाहने आहेत. आरटीओतर्फे वाहनांची प्रदूषण तपासणी नियमितपणे केली जाते. केंद्र सरकारच्या नवीन धोरणाची अंमलबजावणी सक्तीने केली जाईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी खंडेराव देशमुख यांनी सांगितले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अशोक कारे यांनी लॉकडाऊनच्या काळात नागपूरचे प्रदूषण कमी झाल्याची माहिती दिली.