जग संशोधनात गुंतलेय, भारत जुन्याच संकल्पना मिरवतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:12 PM2018-12-01T12:12:49+5:302018-12-01T12:14:27+5:30
संशोधनाच्या बाबतीत जग कुठल्या कुठे गेले आहे आणि आपण त्याच जुन्या संकल्पना मिरवण्यात गुंतलो असल्याची खंत सॉलिड स्टेट फिजिक्स लेबारेटरी (एसएसपीएल) चे माजी संचालक आणि नॅशनल फिजिक्स लेबॉरेटरीचे प्रा. विक्रम कुमार यांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगातील सौर ऊर्जेच्या स्थितीबाबत विचार केला तर सौर पॅनलमध्ये वापरले जाणारे फोटोव्होल्टाईक (पीव्ही) सेल निर्मितीत चीन सर्वात मोठा उत्पादक देश आहे. दुसरीकडे भारत हा चीनकडून सर्वात जास्त पीव्ही पॅनल आयात करणारा देश आहे, कारण या क्षेत्रातील संशोधनाच्या बाबतीत आपण नगण्य आहोत. हीच परिस्थिती सेमीकंडक्टर आणि इतर क्षेत्रातील संशोधनाबाबतही आहे. खर तर संशोधनाच्या बाबतीत जग कुठल्या कुठे गेले आहे आणि आपण त्याच जुन्या संकल्पना मिरवण्यात गुंतलो असल्याची खंत सॉलिड स्टेट फिजिक्स लेबारेटरी (एसएसपीएल) चे माजी संचालक आणि नॅशनल फिजिक्स लेबॉरेटरीचे प्रा. विक्रम कुमार यांनी व्यक्त केली.
विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नालॉजी (व्हीएनआयटी) च्यावतीने आयोजित पाचव्या ‘सेमीकंडक्टर मटेरियल अॅन्ड डिव्हाईसेस’ विषयावरील परिषदेच्या उद््घाटनप्रसंगी प्रा. विक्रम कुमार बोलत होते. यावेळी व्हीएनआयटीचे संचालक डॉ. पी.एम. पडोळे, समन्वयक डॉ. आर. एम. पात्रीकर, सहसमन्वयक डॉ. आर.बी. देशमुख आणि संशोधन व विकास विभागाचे अधिष्ठाता डॉ. व्ही.बी. बोरघाटे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रा. विक्रम कुमार यांनी सेमीकंडक्टरच्या वर्तमान परिस्थितीवर प्रकाश टाकला. मानवाच्या दैनंदिन जीवनात सेमीकंडक्टरचे महत्त्व आहे. टीव्ही, संगणक, रेडीओ व क्षणोक्षणी हाताळणाऱ्या मोबाईलपासून प्रत्येक इलेक्ट्रानिक्स उपकरणात सेमीकंडक्टरचा उपयोग महत्त्वपूर्ण झाला आहे. कारण विद्युत प्रवाह नियंत्रण आणि उपकरणाचा वेग वाढविण्याची क्षमता सेमीकंडक्टरच्या उपयोगातून बनलेल्या डिव्हाईसमध्ये असते.
प्रा. कुमार यांनी ऐतिहासिक पार्श्वभूमीकडेही लक्ष वेधले. १८७४ मध्ये कार्ल ब्राउन यांनी सेमीकंडक्टरचा शोध लावला होता. पुढे सर जे.सी. बोस व रसेल ओहलपासून मार्कोनीद्वारे रेडिओचा शोध लावेपर्यंत यावर झपाट्याने संशोधन सुरू झाले जे आजतागायेत सुरू आहे. बहुतेक उच्च शक्ती (हायपॉवर) असलेली उपकरणे मेटल आॅक्साईड सेमीकंडक्टर फिल्ड इफेक्ट ट्रान्झिस्टरने तयार झालेली असतात. त्यांनी यावेळी देशातील शिक्षण व्यवस्थेतील दोष अधोरेखित केला. ते म्हणाले, १९६० च्या दशकात संपूर्ण जग सेमीकंडक्टरच्या नवीन संशोधनात गुंतलेले असताना भारतात मात्र विद्यार्थ्यांना १९९० च्या दशकापर्यंत व्हॅक्यूम इलेक्ट्रानिक्सबाबत शिकविले जात होते, जे जगाने केव्हाच सोडले होते. त्यांनी सेमीकंडक्टरवर सुरू असलेल्या संशोधनाबाबत मार्गदर्शन करताना उपस्थितांना त्याचे महत्त्व कळावे याची काळजी घेतली.
यावेळी डॉ. पी.एम. पडोळे यांनी विद्यार्थ्यांना संशोधनासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. सेमीकंडक्टर मटेरियलवर सुरू असलेल्या विविध संशोधन प्रकल्पाची माहिती देत त्यांनी या तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती होत असल्याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. रश्मी गौतम यांनी केले.