नागपुरातील RSS कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी; महापारेषणचा अभियंता पोलिसांच्या ताब्यात
By योगेश पांडे | Published: December 1, 2022 04:26 PM2022-12-01T16:26:44+5:302022-12-01T16:30:00+5:30
२५ नोव्हेंबर रोजी नागपुरातील सक्करदरा पोलीस स्टेशनमध्ये आलं होतं निनावी पत्र
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातील कार्यालय तसेच कविवर्य भट सभागृह बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या अभियंत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने ही धमकी देणारे निनावी पत्र पाठविले होते. धक्कादायक म्हणजे असे निनावी पत्र लिहून खळबळ उडवून देणारा आरोपी महापारेषणचा कार्यकारी अभियंता असल्याची माहिती आहे. त्याचे नाव पोलिसांनी जारी केलेले नाही.
२५ नोव्हेंबर रोजी नागपुरातील सक्करदरा पोलीस स्टेशनमध्ये एक निनावी पत्र मिळाले होते. त्यामध्ये संघाचे रेशीमबाग येथील कार्यालय, रेशीमबाग मैदान आणि भट सभागृह या ठिकाणी स्फोट करू अशी धमकी लिहिण्यात आली होती. सोबतच एक बॉम्बचे चित्रही त्यावर काढण्यात आले होते. असे निनावी पत्र मिळाल्यानंतर पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून शोध घेण्यास सुरुवात केली.
सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी नागपूरच्या झिरो माइल येथील पोस्ट ऑफिस मध्ये निनावी पत्र पेटीत टाकणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी करण्यात आली असता त्याने कबुली दिली. मानसिक स्थिती योग्य नसल्यामुळे असे केल्याचा दावा त्याने चौकशीदरम्यान केला आहे.