बगिच्यात कुत्रा फिरविला म्हणून अभियंत्यावर विटांनी हल्ला
By योगेश पांडे | Published: April 23, 2024 04:07 PM2024-04-23T16:07:22+5:302024-04-23T16:08:14+5:30
Nagpur : बगिच्यात कुत्रा आणण्याच्या रागातून अभियंत्याला शिवीगाळ आणि मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासच्या बगिच्यात कुत्रा फिरविल्याच्या कारणावरून एका तरुणाने संगणक अभियंत्यावर विटांनी हल्ला करत जखमी केले. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
प्रवीण गुलेरिया (३५, मानवसेवानगर) असे जखमीचे नाव आहे, तर बंटी उर्फ गौरव इंगोले (३०) हा आरोपी आहे. प्रवीण हे एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत अभियंता आहे तर त्यांची पत्नी एक शाळा संचालित करते. सोमवारी सकाळी पाऊस असल्याने ते त्यांच्या कुत्र्याला घरासमोरीलच नासुप्रच्या बगिच्यात फिरायला घेऊन गेले. तेथे बंटी उभा होता व त्याने कुत्रा आणण्यास मनाई केली. माझे गाय व कोंबडी बगिच्यात पाळतो, येथे कुत्रा आणू नको असे त्याने म्हटले. यावर प्रवीण यांनी हा बगिचा असून गोशाळा नाही असे उत्तर दिले. त्यावरून बंटी संतापला व शिवीगाळ करू लागला. त्याने प्रवीण यांना सर्वांसमोरच हत्या करण्याची धमकी दिली. त्याने बगिच्यात असलेल्या विटांनी प्रवीण यांच्यावर हल्ला केला. त्याने फेकलेल्या विटांमुळे प्रवीण जखमी झाले व घाबरून घराकडे निघाले. आरडाओरड एकून बंटी यांची पत्नी बाल्कनीत आली असता त्यांनादेखील बंटीने घाणेरडी शिवीगाळ केली. त्याने त्यांनादेखील जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर प्रवीण यांनी गिट्टीखदान पोलीस ठाणे गाठून बंटीविरोधात तक्रार केली. पोलिसांनी बंटीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.