अभियंता तरुणीचे अपहरण करून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 01:45 AM2017-09-06T01:45:46+5:302017-09-06T01:45:59+5:30
मुंबईत जॉब करणाºया नागपुरातील एका पोलीस कर्मचाºयाच्या अभियंता मुलीचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याच्या वार्तेने नागपुरात खळबळ निर्माण झाली आहे. अंकिता सुनील कनोजिया (वय २२) असे तिचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबईत जॉब करणाºया नागपुरातील एका पोलीस कर्मचाºयाच्या अभियंता मुलीचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याच्या वार्तेने नागपुरात खळबळ निर्माण झाली आहे. अंकिता सुनील कनोजिया (वय २२) असे तिचे नाव आहे. हे धक्कादायक वृत्त कळल्यानंतर येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी ठाणे, मुंबई आणि रत्नागिरी पोलिसांकडून माहिती मिळविण्यासाठी निरंतर प्रयत्न करीत होते.
सुनील ऊर्फ बबलू कनोजिया नामक हवालदार पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. त्यांची मुलगी अंकिता हिने वायसीसी कॉलेजमधून अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. नुकतीच ती मुंबईतील विक्रोळी भागात एका कंपनीत तिची नियुक्ती झाली होती. १५ आॅगस्टला अंकिताला तिचे वडील सुनील कनोजिया यांनी मुंबईला नेऊन सोडले. जवळपास रोजच ती आपल्या परिवारातील सदस्यांसोबत फोनवरून संपर्कात होती. ३ सप्टेंबरला रात्री आणि ४ सप्टेंबरला सकाळी तिचे तिच्या वडिलांसोबत बोलणे झाले. त्यानंतर मात्र तिचा मोबाईल संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याची कॅसेट वाजत होती. मोबाईल खराब झाला असावा, असे समजून कुटुंबीयांनी फारसे मनावर घेतले नाही. सोमवारी रात्रीही प्रयत्न केले, मात्र बोलणे झाले नाही. त्यानंतर आज सकाळी तसेच झाल्याने घरच्यांची चिंता वाढली. त्यांच्याकडून अंकिताबाबत माहिती काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास स्थानिक पोलिसांना अंकिताची हत्या झाल्याचे धक्कादायक वृत्त कळले. त्यामुळे येथे एकच खळबळ उडाली. कनोजिया परिवारासोबतच त्यांचे सहकारी आणि येथील वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनीही प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वेगवेगळी माहिती पुढे येऊ लागली.
लोकमतने यासंबंधाने रत्नागिरी पोलिसांशी संपर्क केला असता त्यांनी जुजबी स्वरूपाची माहिती दिली. मंगळवारी दुपारी तीन आरोपी रत्नागिरी ठाण्यात आले आणि त्यांनी एका तरुणीची हत्या केल्याचे सांगितले, पुढील तपास सुरू असल्याचे रत्नागिरीचे
पोलीस अधीक्षक अशोक प्रणय यांनी सांगितले. यासंबंधाने अधिक माहिती देण्याचे त्यांनी टाळले. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपींनी अंकिताची ठाण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून अपहरण केले. तिला आधी अंबरनाथ आणि नंतर गोव्याला नेऊन तिची हत्या केली आणि मृतदेह फेकून दिला. त्यानंतर आरोपींनी रत्नागिरी पोलिसांकडे आत्मसमर्पण केले.
हत्या केली अन् गोव्याला गेले
उशिरा रात्री एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी अंबरनाथ येथील एका बहुमजली इमारतीच्या सदनिकेत अंकितावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. अंकिताने तीव्र प्रतिकार करून आरडाओरड केली. त्यामुळे आरोपींनी तिचा गळा दाबून तिला ठार मारले. त्यानंतर तिचा मृतदेह एका वाहनातून कर्नाटकच्या सीमेवर नेऊन फेकला. तेथून आरोपी गोव्याला गेले. तेथे मौजमजा केल्यानंतर ते रत्नागिरीला आले आणि त्यांनी आत्मसमर्पण केले. आरोपीमध्ये एका बिल्डरचा समावेश असल्याचीही सूत्रांची माहिती आहे.