अभियांत्रिकी महाविद्यालयांचे कंबरडे मोडले, वर्ग कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:09 AM2021-01-18T04:09:01+5:302021-01-18T04:09:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अगोदरच कोरोनामुळे प्रवेश प्रक्रियेला उशीर झाला असताना विभागातील खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये आर्थिक अडचणींचा सामना ...

Engineering colleges broke, when will the classes start? | अभियांत्रिकी महाविद्यालयांचे कंबरडे मोडले, वर्ग कधी सुरू होणार?

अभियांत्रिकी महाविद्यालयांचे कंबरडे मोडले, वर्ग कधी सुरू होणार?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अगोदरच कोरोनामुळे प्रवेश प्रक्रियेला उशीर झाला असताना विभागातील खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. शिष्यवृत्ती थकीत असून महाविद्यालयांना आर्थिक गणितांची जुळवाजुळव करताना नाकी नऊ येत आहेत. राज्य शासनाकडूनदेखील वर्ग सुरू करण्याबाबत नेमके निर्देश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

२०१९-२० च्या शैक्षणिक सत्रातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीच्या रकमेचा दुसरा हप्ता मिळायला बराच उशीर झाला.

यासंदर्भात ‘विदर्भ अनएडेड इंजिनीअरिंग कॉलेज मॅनेजमेंट असोसिएशन’तर्फे वारंवार सरकारकडे मागणी करण्यात आली होती. मार्चपासूनच वर्ग नसल्याने अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांनी प्राध्यापकांच्या वेतनाला कात्री लावली. बऱ्याच महाविद्यालयांत तर मागील चार ते पाच महिन्यांपासून प्राध्यापकांना अगदी तुटपुंजे वेतन मिळत आहे. शिवाय तृतीय सत्रापासूनचे ऑनलाइन वर्ग सुरू झाले. त्याचा वेगळा खर्च महाविद्यालयांना करावा लागत आहे. प्राध्यापक महाविद्यालयांत तर येत आहेत, मात्र अनेकांचा जाण्या-येण्याचा खर्चदेखील निघत नसल्याचे चित्र आहे.

त्यामुळेच लवकरात लवकर प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन वर्ग परत सुरू कधी होतात, याकडे महाविद्यालयांचे लक्ष लागले आहे. राज्य शासनाने शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. अभियांत्रिकीचे विद्यार्थी तर वयाने मोठे असतात व ते स्वत:ची काळजी घेऊ शकतात. त्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

वेतन नियमित कधी होणार ?

अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अर्धेच वेतन दिले जात आहे. काही महाविद्यालयांत तर हा आकडा २५ टक्के इतकाच आहे. ऑनलाइन वर्ग नियमित सुरू असताना वेतन नियमित का नाही, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित करण्यात येत आहे. महाविद्यालयांविरोधात तक्रार केल्यास रोजगारावर गदा येईल या भीतीने कुणी बोलण्यासही समोर येत नसल्याचे चित्र आहे.

विभागातील महाविद्यालयांची संख्या

शासकीय : १

खासगी : ४३

प्राध्यापकांची संख्या: ४,३२७

विद्यार्थी क्षमता: १७,१३६

Web Title: Engineering colleges broke, when will the classes start?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.