नागपुरात अभियांत्रिकीची प्रश्नपत्रिका फुटली; व्हाॅट्सअॅपवर शेअर करण्यात आली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2022 07:00 AM2022-06-23T07:00:00+5:302022-06-23T07:00:10+5:30
Nagpur News राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेदरम्यान साेमवारी २० जून राेजी इंजिनीअरिंगच्या आठव्या सेमिस्टरची प्रश्नपत्रिका लीक झाली.
आशीष दुबे
नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेदरम्यान साेमवारी २० जून राेजी इंजिनीअरिंगच्या आठव्या सेमिस्टरची प्रश्नपत्रिका लीक झाली. हुडकेश्वर राेडवरील एका अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ही घटना समाेर आली आहे. माहिती मिळाल्यानंतर विद्यापीठाच्या परीक्षा विभागात खळबळ उडाली. त्यामुळे त्वरीत काॅलेजला दुसरी प्रश्नपत्रिका पाठविण्यात आली. मात्र या घटनाक्रमाबाबत अनेक विद्यार्थी अनभिज्ञ हाेते.
या प्रकरणाचा कुणालाही थांगपत्ता लागू नये म्हणून काॅलेजच्या प्राचार्यांनी तातडीने महाविद्यालयाच्या परीक्षा नियंत्रण समितीच्या सदस्यांना कारणे दाखवा नाेटीस बजावली आणि त्यांना परीक्षा कार्यातून बाजुला केले. प्रकरणाची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागालाही देण्यात आली. सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सुचना मिळाल्यानंतर परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. प्रफुल्ल साबळे स्वत: अधिकाऱ्यांसह महाविद्यालयात पाेहचले. प्रकरणाची गंभीरता पाहता आधी पाठविलेल्या प्रश्नपत्रिका रद्द करून दुसऱ्या प्रश्नपत्रिकांचा सेट काॅलेजला दिला. परीक्षेला झालेला उशीर लक्षात घेत विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळही देण्यात आला.
याबाबत महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क केला असता त्यांनीही बातमीला दुजाेरा दिला. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने प्रश्नपत्रिका बदलून दिल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर परीक्षा नियंत्रण कक्षाच्या कर्मचाऱ्यांना हटविण्यात आले. डाॅ. प्रफुल्ल साबळे यांनी केवळ प्रश्नपत्रिका बदलून दिल्याची माहिती दिली. या प्रकरणातील दाेषींवर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. उल्लेखनीय म्हणजे साेमवारी बीई आठव्या सेमिस्टरचा शेवटचा पेपर हाेता.
व्हाॅट्सअॅपवर शेअर झाली प्रश्नपत्रिका
सुत्राच्या माहितीनुसार महाविद्यालयात उन्हाळी परीक्षेसाठी हाेम सेंटर तयार करण्यात आले आहे. विद्यापीठातर्फे प्रश्नपत्रिकेची डाउनलाेड लींक काॅलेजला परीक्षेच्या दाेन तासाआधी पाठविण्यात आली हाेती. लींक आल्यानंतर त्याची फाेटाे काढून व्हाॅट्सअॅपवर शेअर करण्यात आली. मात्र प्रश्नपत्रिका व्हाॅट्सअॅपने बाहेर कशी आली, हे मात्र प्राचार्यांनी सांगितले नाही.
दुसऱ्या काॅलेजकडे गेल्याची शंका
सुत्रानुसार या महाविद्यालयात झालेल्या घटनेची माहिती दुसऱ्या काॅलेजला लागली नाही. मात्र या महाविद्यालयाव्यतिरिक्त दुसऱ्या महाविद्यालयात प्रश्नपत्रिका पाेहचली असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.
काॅलेजवर काय कारवाई हाेणार?
प्रकरण समाेर आल्यानंतर या महाविद्यालयावर काय कारवाई हाेणार, असा प्रश्न विचारला जात आहे. परीक्षा विभागाच्या काही अधिकाऱ्यांच्या मते काॅलेजवर कारवाई हाेण्याची शक्यता दिसत नाही. कारण हे महाविद्यालय शहरातील एका माेठ्या राजकीय व्यक्तिचे आहे आणि त्यांचे विद्यापीठात चांगले वजन आहे.