नागपुरात इंजिनियरिंंगच्या विद्यार्थिनीसह तिघींची छेडखानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 07:55 PM2018-02-21T19:55:47+5:302018-02-21T20:00:01+5:30
इंजिनियरिंगच्या एका विद्यार्थिनीसह तीन महिलांची छेडखानी करून मारहाण करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंजिनियरिंगच्या एका विद्यार्थिनीसह तीन महिलांची छेडखानी करून मारहाण करण्यात आली.
पहिली घटना सीताबर्डी मेनरोडवर घडली. एका हॉकरने महिलेशी आपत्तीजनक वर्तन करून तिच्या पतीला मारहाण केली. टेकडीलाईन येथील निशांत सोनी असे आरोपीचे नाव आहे. तो सीताबर्डी मेनरोड येथे फूटपाथवर कपडे विक्रीचा व्यवसाय करतो. तक्रारकर्त्या महिलेनुसार निशांतकडून सोमवारी गारमेंटची खरेदी केली होती. कपडे पसंत न पडल्याने ते बदलविण्यासाठी ती पतीसोबत आली होती. ती ज्या ब्रॅन्डच्या गारमेंटची मागणी करीत होती त्याची किंमत निशांतने १० रुपये अधिक सांगितली होती. निशांत गारमेंट आपल्याजवळ ठेवून तो पैसे परत करू लागला. परंतु तिच्या पतीने पैसे परत घेण्यास नकार दिला. निशांत महिलेच्या पतीच्या खिशात पैसे टाकू लागला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. पाहता पाहता दोघेही एकमेकांना मारहाण करू लागले. महिलेनुसार ती भांडण सोडविण्याचा प्रयत्न करीत असता निशांतने तिच्याशीही आपत्तीजनक वर्तन केले. त्यानंतर महिला पतीसोबत सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास पोहोचली. पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्याने पीडित दाम्पत्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार केली. यानंतर पोलिसांनी छेडखानी, मारहाण आणि धमकाविण्याचा गुन्हा दाखल करून निशांतला अटक केली. निशांतनेसुद्धा महिलेच्या पतीविरुद्ध मारहाणीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
दुसरी घटना हिंदुस्थान कॉलनी चौकात घडली. २० वर्षीय इंजिनियरिंगची विद्यार्थिनी १७ फेब्रुवारी रोजी सकाळी दुचाकीने जात असताना हिंदुस्थान कॉलनी चौकात हेल्मेट घालण्यासाठी थांबली होती. त्याचवेळी धरमपेठ ट्रॅफिक पार्क चौकात राहणारा २० वर्षीय प्रतीक महाजन कारने
विद्यार्थिनीजवळ आला. दोन मिनिटे बोलण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु विद्यार्थिनीने नकार देताच तिला पकडून बळजबरीने कारमध्ये बसविले. विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार आरडाओरड केल्याने तो आणखी संतापला. त्याने शिवीगाळ करीत आपत्तीजनक व्यवहार केला तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अल्पवयीन मुलीची छेडखानी
नंदनवनमध्ये एका अल्पवयीन मुलीची शेजारी राहणाºयाने छेडखानी केली. २५ वर्षीय राकेश नागदिवे याने सोमवारी दुपारी १७ वर्षीय विद्यार्थिनीसोबत आपत्तीजनक वर्तन केले. विरोध केला असता मारहाण करून धमकावले. नंदनवन पोलिसांनी छेडखानी, धमकावणे आणि अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे.