अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना विद्यापीठाचा ‘दे धक्का’

By admin | Published: August 5, 2016 02:56 AM2016-08-05T02:56:13+5:302016-08-05T02:56:13+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा प्रणालीचा कारभार ‘आॅनलाईन’ झाल्यामुळे निकालांतील गोंधळ होणारच नाही, अशी अपेक्षा होती.

Engineering students give 'push' | अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना विद्यापीठाचा ‘दे धक्का’

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना विद्यापीठाचा ‘दे धक्का’

Next

तांत्रिक चुकीचा फटका : गुणपत्रिकेत शेकडो विद्यार्थ्यांना दाखविले अनुपस्थित
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा प्रणालीचा कारभार ‘आॅनलाईन’ झाल्यामुळे निकालांतील गोंधळ होणारच नाही, अशी अपेक्षा होती. परंतु ‘आॅल इज वेल’ची अपेक्षा करणाऱ्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना जोरदार धक्का बसला आहे. परीक्षेला उपस्थित असूनदेखील अभियांत्रिकीच्या अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेत अनुपस्थित दाखविण्यात आले आहे. यामुळे ‘कॅम्पस प्लेसमेन्ट’मध्ये निवड होऊनदेखील बरेच विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत.
अनेक अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांचे उन्हाळी परीक्षेपासून ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकन सुरू झाले व निकालांचा वेग वाढला. अभियांत्रिकीचे मूल्यांकनदेखील ‘आॅनस्क्रीन’ झाले. परंतु त्याचा वेग संथ होता. यामुळे विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून निकालाची प्रतीक्षा होती. परंतु दोन दिवसांपूर्वी निकाल जाहीर झाल्यावर शेकडो विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांच्या गुणपत्रिकेत चक्क सोडविलेल्या पेपरमध्ये अनुपस्थित दाखवून त्यांना अनुत्तीर्ण करण्यात आले. मागील सत्रांमध्ये प्रावीण्य श्रेणीतील गुण मिळविलेले काही हुशार विद्यार्थीदेखील या गोंधळामुळे अनुत्तीर्ण झाले आहेत. यात काही विशिष्ट अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे. यात नागपूर व शहराबाहेरील महाविद्यालयांचा समावेश आहे. यासंदर्भात संबंधित विद्यार्थ्यांनी लगेच महाविद्यालयात धाव घेतली. त्यावेळी त्यांना विद्यापीठाकडे पाठविण्यात आले. संबंधित बाब विद्यापीठ अधिकाऱ्यांच्या कानी पडल्यावर तेदेखील बुचकळ््यात पडले.(प्रतिनिधी)



विद्यार्थी चिंतेत
अंतिम वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक महाविद्यालयांत ‘कॅम्पस प्लेसमेन्ट’ आटोपले असते. विद्यार्थ्यांना पुढील परीक्षा उत्तीर्ण करायच्या असतात. परंतु पेपर चांगले गेले असतानादेखील त्यात अनुपस्थित दाखवून अनुत्तीर्ण केल्यामुळे अनेक विद्यार्थी चिंतेत पडले आहेत. हातातील लाखमोलाची नोकरी जाते की काय असा प्रश्न त्यांना पडला आहे. शिवाय अनेक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी प्रवेशाची तयारी केली होती. त्यांचादेखील या निकालामुळे भ्रमनिरास झाला आहे.

विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनादेखील फटका
दरम्यान, विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनादेखील विद्यापीठातील भोंगळ कारभाराचा फटका बसला आहे. ‘बीए एलएलबी’च्या पाच वर्षीय अभ्यासक्रमातील चौथ्या सत्राचा निकाल जाहीर झाला. यात इंग्रजी व फिलॉसॉफी या दोन पेपरमध्ये अनेक विद्यार्थ्यांना चक्क अनुपस्थित दाखविण्यात आले आहे. विधी महाविद्यालयातील विद्यार्थी परीक्षा भवनात गेले असताना त्यांना तेथे कर्मचाऱ्यांनी योग्य उत्तर दिले नाही. एक तर निकाल वेळेवर लागले नाही आणि घाईगडबडीत उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकन योग्य प्रकारे झाले नसल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे. विधी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत प्रतिक्रियेसाठी परीक्षा नियंत्रकांशी संपर्क होऊ शकला नाही.

विद्यापीठाचे विद्यार्थ्यांवरच खापर
यासंदर्भात परीक्षा नियंत्रक डॉ.नीरज खटी यांना विचारणा केली असता त्यांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारी येत असल्याचे मान्य केले. यात विद्यापीठाची काहीच चूक नाही. विद्यार्थ्यांनीच त्यांचा परीक्षा अर्ज योग्य पद्धतीने भरला नव्हता. अर्जात ‘इलेक्टिव्ह’ पेपर म्हणून एका विषयाचे नाव दिले आणि प्रत्यक्षात दुसराच पेपर दिला. महाविद्यालयांनीदेखील त्यांना मार्गदर्शन केले नाही व ऐनवेळी विद्यार्थ्यांची ही चूक सुधारण्याची पत्राद्वारे विनंती केली. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी झालेली चूक ‘मॅन्युअली’ बदलून देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
गुणपत्रिकांमध्येदेखील त्रुटी
विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका संकेतस्थळावर आलेल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांमध्ये त्रुटी आहेत. कुठे विद्यार्थ्यांचे नाव बदलण्यात आले आहे, तर कुठे विद्यार्थ्यांना विद्यार्थिनी असे दाखविण्यात आले आहे. काही गुणपत्रिकांवर परीक्षा नियंत्रकांची सहीच नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

Web Title: Engineering students give 'push'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.