अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर ‘सीईटी सेल’चे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:27 AM2019-06-22T00:27:20+5:302019-06-22T00:33:11+5:30
अंगातून घामाच्या धारा निघत असतानादेखील अभियांत्रिकी प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी तासन्तास रांगामध्ये उभे राहणाऱ्या विद्यार्थी व पालकांना ‘सीईटी सेल’ने मोठा धक्का दिला आहे. ‘सर्व्हर’वर ताण आल्याचे कारण देत अर्ज भरण्यापासून सर्व प्रवेशप्रक्रिया आता परत राबविण्यात येणार आहे. २४ जूनपासून ही प्रक्रिया सुरू होणार असून अद्यापपर्यंत ‘सीईटी सेल’ने नवीन वेळापत्रक जाहीर केलेले नाही. दरम्यान, या गलथान कारभारामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंगातून घामाच्या धारा निघत असतानादेखील अभियांत्रिकी प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी तासन्तास रांगामध्ये उभे राहणाऱ्या विद्यार्थी व पालकांना ‘सीईटी सेल’ने मोठा धक्का दिला आहे. ‘सर्व्हर’वर ताण आल्याचे कारण देत अर्ज भरण्यापासून सर्व प्रवेशप्रक्रिया आता परत राबविण्यात येणार आहे. २४ जूनपासून ही प्रक्रिया सुरू होणार असून अद्यापपर्यंत ‘सीईटी सेल’ने नवीन वेळापत्रक जाहीर केलेले नाही. दरम्यान, या गलथान कारभारामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.
अभियांत्रिकीच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ‘ऑनलाईन’ अर्ज भरले व त्यानंतर आवश्यक कागदपत्र अपलोड करण्यासाठी २१ जूनपर्यंत कालावधी देण्यात आला होता. ‘एसएएआर’ या संकेतस्थळावर नोंदणी करायची होती व प्रवेश प्रक्रिया अर्ज भरायचा होता. या प्रक्रियेसाठी काही कॉलेजमध्ये सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात आले. मात्र ‘सर्व्हर डाऊन’ असल्यामुळे विद्यार्थ्यांची कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अक्षरश: परीक्षाच झाली.
राज्यभरातून तक्रारी येत असल्याने ‘सीईटी सेल’ने तातडीची बैठक बोलविली. विद्यार्थ्यांनी भरलेली माहिती एकत्रितपणे संकलित करताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. सदोष माहितीच्या आधारे अंतरिम गुणवत्ता यादी घोषित करणे धोकादायक असल्याचे मत तज्ज्ञ समितीने व्यक्त केले. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियाच रद्दबातल करण्यात आली. आता २४ जूनपासून प्रक्रिया परत सुरू करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर अर्ज भरले होते किंवा कागदपत्रांची पडताळणी केली होती त्यांना परत अर्ज भरावा लागणार आहे.
विद्यार्थी, पालक संतप्त
सीईटीला बसलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी गुरुवारपर्यंत अभियांत्रिकी, फार्मसी, वास्तुशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन अशा विविध अभ्यासक्रमांसाठी तासन्तास सेतू केंद्रावर बसून नोंदणी केली होती. मात्र वेळ फुकट गेल्याने पालक आणि विद्यार्थी संताप व्यक्त करीत आहेत. जर ‘सीईटी सेल’ची अगोदरपासून तयारी नव्हती मग प्रक्रिया राबवलीच का, असा संतप्त सवाल पालकांकडून करण्यात येत आहे.
तंत्रज्ञानात इतके माघारलेले का ?
‘सीईटी सेल’ने संकेतस्थळाच्या ‘सर्व्हर’चे कारण समोर करुन प्रक्रिया रद्द केली आहे. मात्र प्रवेशप्रक्रियेचे ‘सर्व्हर डाऊन’ होऊ नये याची काळजी अगोदर का घेण्यात आली नाही. मुंबई, पुणे यासह देशात मोठमोठ्या आयटी कंपन्या आहेत. त्यांची यात मदत का घेण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सबकुछ ऑनलाईनचे दावे करणाऱ्या प्रशासनाचे दावे या गलथान कारभारामुळे उघडे पडले आहे.