आश्रमशाळेतही आता इंग्रजी भाषेतून शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 11:36 AM2019-09-21T11:36:06+5:302019-09-21T11:36:30+5:30
५२ शासकीय आश्रमशाळांमध्ये पहिली इयत्तापासून इंग्रजी आणि सहावी इयत्तापासून सेमी इंग्रजी माध्यमात शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेता यावे यासाठी शासकीय आश्रमशाळांचे रूपांतर इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमात करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागातर्फे घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ५२ शासकीय आश्रमशाळांमध्ये पहिली इयत्तापासून इंग्रजी आणि सहावी इयत्तापासून सेमी इंग्रजी माध्यमात शिक्षणाचे धडे दिले जाणार आहे.
महाराष्ट्रातील दुर्गम भागात आदिवासींच्या प्रगतीसाठी आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत ५०२ शासकीय आश्रमशाळा सुरु आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमानुसार या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून शिक्षण देण्यात येते. इंग्रजी माध्यमात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना खासगी नामांकित शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. या शाळेत विद्यार्थ्यांना पहिली ते बारावी शिक्षण मोफत देण्यात येते. या योजनेंतर्गत १७९ शाळांमध्ये ५४ हजार विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत आहेत.
गेल्या काही वर्षात आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी आदिवासी पालकांचा कल वाढला आहे. यासाठी विभागामार्फत सुरु असलेल्या शासकीय आश्रमशाळेतच आदिवासी विद्यार्थ्यांची इंग्रजी माध्यमातील शिक्षणाची सोय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन आयएसओ मानांकन मिळालेल्या शासकीय आश्रमशाळांचे रूपांतर इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमात करण्यात येणार आहे. शाळा इमारत, वसतिगृह, वीज, दळणवळण, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, क्रीडांगण अशा सुविधा असलेल्या आश्रमशाळा इंग्रजी माध्यमासाठी निवडण्यात येणार आहेत. नागपूर अप्पर आयुक्त कार्यालयांतर्गत १३ आश्रमशाळेत इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमातील शिक्षण सुरु करण्यात येणार आहे.या शाळेत सीबीएससी माध्यमातून शिक्षण घेतलेले पदवीधारक उमेदवार यांची प्राथमिक शिक्षक म्हणून गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंत शिक्षण संस्थांबरोबर सामंजस्य करार करून गुणवत्ता धारक शिक्षक आणि शिक्षणतज्ञ यांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे.
नागपूर अप्पर आयुक्त कार्यालयांतर्गत येणाऱ्या आश्रमशाळा
आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालय नागपूर अंतर्गत १३ आश्रम शाळांचा समावेश करण्यात आला आहे. यात नागपूर जिल्ह्यात १, चंद्रपूर जिल्ह्यात ३, गडचिरोली ४, गोंदिया ५ आश्रमशाळांचा समावेश आहे.