एक रुपयात मिळणार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:11 AM2021-02-26T04:11:32+5:302021-02-26T04:11:32+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काेराडी : मजूर, कंत्राटी कामगार व मागासबहुल वस्ती असणाऱ्या कोराडी व महादूला येथील गोरगरिबांना आता इंग्रजी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेराडी : मजूर, कंत्राटी कामगार व मागासबहुल वस्ती असणाऱ्या कोराडी व महादूला येथील गोरगरिबांना आता इंग्रजी माध्यमाचे शिक्षण दरराेज एक रुपया खर्चाने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोराडीतील सेवानंद पब्लिक स्कूलने हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत सर्व विद्यार्थ्यांना दर दिवशी एक रुपया अशा अल्प खर्चावर इंग्रजी माध्यमाचे शिक्षण उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
काेराडी येथे सर्वात जुनी असलेली सेवानंद विद्यालय ही शाळा चालविली जाते. याच ठिकाणी सुसज्ज इमारत, क्रीडांगण व मनोरंजनाच्या बाबी उपलब्ध करून देण्यात आल्या असून, सेवानंद पब्लिक स्कूलच्या माध्यमातून या परिसरातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती व्हिलेज डेव्हलपमेंट सोसायटीच्या अध्यक्ष ज्योती बावनकुळे यांनी दिली.
सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी नर्सरी व इयत्ता पहिलीमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. इंग्रजी माध्यमाचे शिक्षण राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. या परिसरातील गोरगरिबांना इच्छा असतानाही आर्थिक अडचणीमुळे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण घेण्यात अडचणी निर्माण होतात. त्यांनाही अल्पदरात इंग्रजी माध्यमाचे शिक्षण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने शाळेत हा उपक्रम सुरू केल्याचे ज्योती बावनकुळे यांनी सांगितले.