जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या!
By Admin | Published: February 28, 2016 02:58 AM2016-02-28T02:58:52+5:302016-02-28T02:58:52+5:30
जीवन एक सुंदर अनुभव आहे. त्यातील प्रत्येक क्षण प्रेमाची अनुभूती देतो. त्यामुळे या जीवनातील प्रत्येक क्षणाचा ...
‘जीवनाच्या सौंदर्याचा आनंद’ वर व्याख्यान : ब्रह्माकुमारी शिवानी बहन यांचे आवाहन
नागपूर : जीवन एक सुंदर अनुभव आहे. त्यातील प्रत्येक क्षण प्रेमाची अनुभूती देतो. त्यामुळे या जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, असे आवाहन जगविख्यात ब्रह्माकुमारी शिवानी बहन यांनी केले.
लोकमत समाचार आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, नागपूर शाखेच्या संयुक्त विद्यामाने लोकमत सखी मंच सदस्य आणि वाचकांसाठी ‘जीवनाच्या सौंदर्याचा आनंद’ या विषयावर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकूलातील इनडोअर स्टेडियममध्ये शनिवारी हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला अतिथी म्हणून लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व खासदार विजय दर्डा, बह्माकुमारी पुष्पारानी दीदी, ज्येष्ठ अभिनेते सुरेश ओबेरॉय व सुशील अग्रवाल उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर विजय दर्डा यांच्या हस्ते ब्रह्माकुमारी शिवानी बहन व सुरेश ओबेरॉय यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर शिवानी बहन यांच्या व्याख्यानाला सुरुवात झाली. त्या पुढे म्हणाल्या, आम्ही प्रेम मागणारे नव्हे, तर प्रेम वाटणारे झालो पाहिजे. दुसऱ्याकडून आदर मागण्याऐवजी त्यांना आदर दिला पाहिजे. जेथे आत्मा हा सुंदर, शुद्घ व पवित्र असतो तेच खरे सतयुग असते. मात्र आज कलियुग असून, यात आम्ही देण्याऐवजी प्रत्येक गोष्ट मागत असतो. परंतु आम्हाला या कलियुगातून पुन्हा सतयुग आणायचे आहे. या सृष्टीवर पुन्हा स्वर्ग तयार करायचा आहे. अन्यथा ही सृष्टी वास्तव्या योग्य राहणार नाही. पूर्वी प्रत्येक व्यक्तीमधील आत्मा हा शुद्ध होता, पवित्र होता. मात्र आता तो अशुद्ध झाला आहे. त्याला पुन्हा शुद्ध करण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.
आम्ही आपल्या कृतीतून या सुंदर स्वर्गाला नरक बनविले आहे. त्यामुळे आम्हीच या कलियुगाला सतयुग सुद्धा बनवू शकतो. दुसऱ्याने माझ्यासारखे वागावे, अशी आमची इच्छा असते आणि पुढील व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागली नाही, तर आपल्याला क्रोध येतो.
या कलियुगात अशा अपेक्षांना अंत नाही. मात्र दुसऱ्यांकडून अशा अपेक्षा ठेवू नये. सामान्य जीवनात आम्ही एक-दुसऱ्याला आनंदी ठेवण्याचा अजेंडा तयार केला आहे. परंतु ते शक्य नसून, प्रत्येकाने स्वत:ला आनंदी ठेवले, तर प्रत्येकजण आनंदी होईल.
प्रत्येक व्यक्तीमधील आत्मा हा एका लांब प्रवासाला निघाला आहे. या प्रवासात त्याच्या प्रत्येक जन्मातील अनुभव हे वेगवेगळे आहेत. त्यामुळे तो तुमच्या इच्छेप्रमाणेच वागेल, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. दुसऱ्यावर क्रोधित होणे ही हळूहळू सवय बनते. पुढे तो संस्कार ठरतो.
मात्र तो संस्कार बदलण्याची गरज असून, त्या संस्कार परिवर्तनातूनच संसार परिवर्तन होत असल्याचे यावेळी शिवानी बहन यांनी आवार्जून सांगितले. कार्यक्रमाचे संचालन बह्माकुमारी रजनी दीदी यांनी केले. (प्रतिनिधी)
मनातील इच्छा पूर्ण झाली
प्रत्येकाचे एक स्वप्न असते. विचार असतो. दिशा असते. माझी पत्नी ज्योत्स्ना दर्डा यांनी एक दिवस शिवानी बहन यांना टीव्हीवर ऐकले आणि मलाही टीव्ही समोर बोलाविले. तेव्हापासून माझ्या मनात एक इच्छा होती, की शिवानी बहन यांनी नागपुरात यावे आणि आज शिवानी बहन नागपुरात उपस्थित झाल्या असून माझी ती इच्छा पूर्ण झाली आहे, असे लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व खासदार विजय दर्डा यांनी आवर्जून सांगितले. ते पुढे म्हणाले, शिवानी बहन या विज्ञानावर विश्वास ठेवणाऱ्या देशातील श्रेष्ठ महिला आहेत. त्यांच्या माध्यमातून आमच्या देशाचे इतर देशात नाव मोठे होत आहे. आमची जी संस्कृती आणि सभ्यता आहे ती आम्हाला वारसा म्हणून मिळाली आहे. ती आज आम्ही विसरत चाललो आहोत. परंतु शिवानी बहन संपूर्ण जगाला खऱ्या भारताचे दर्शन घडवित आहेत. आमच्या मनातील जे अनंत प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचे सुलभ दर्शन त्या व्याख्यानातून करतील, असा मला विश्वास असल्याचे यावेळी ते म्हणाले.
सुरेश ओबेरॉय यांनी सांगितले अनुभव
बह्माकुमारी शिवानी बहन यांच्या व्याख्यानादरम्यान ज्येष्ठ अभिनेते सुरेश ओबेरॉय यांनी भरगच्च स्टेडियममध्ये आपले अनुभव कथन केले. ते म्हणाले, पूर्वी आपण कुणावरही प्रचंड क्रोधित होत होतो. मात्र मेडिटेशनममुळे राग हा कायमचा विसरलो. मेडिटेशन क्लाससाठी कोणत्याही पात्रतेची गरज नसून, त्या क्लासमधील प्रत्येकजण हा पात्रताधारक असतो. ब्रह्माकुमारी शिवानी बहन यांच्या प्रेमामुळेच मला हे ज्ञान प्राप्त झाले असल्याचेही यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले. त्यामुळे तुम्ही एकदा जर मेडिटेशन क्लासमध्ये गेले, तर तुमचे संपूर्ण जीवन बदलून जाईल, असा विश्वास यावेळी ओबेरॉय यांनी व्यक्त केला.