‘एक दिवस शिक्षकांचा’ एक आनंददायी सोहळा
By admin | Published: September 5, 2015 03:08 AM2015-09-05T03:08:20+5:302015-09-05T03:08:20+5:30
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक दिनाच्या औचित्याने केवळ शिक्षकांसाठी मनोरंजन आणि विविध स्पर्धांच्या कार्यक्रमाचे आयोजन ...
लोकमत कॅम्पस क्लब : पेस आयआयटी मेडिकलचे आयोजन
नागपूर : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक दिनाच्या औचित्याने केवळ शिक्षकांसाठी मनोरंजन आणि विविध स्पर्धांच्या कार्यक्रमाचे आयोजन लोकमत कॅम्पस क्लब आणि पेस व आयआयटी व मेडिकलच्यावतीने एका हॉटेल मध्ये शुक्रवारी करण्यात आले. या कार्यक्रमाचे शीर्षक ‘एक दिवस शिक्षकांचा’ असे होते. याप्रसंगी विनोद, विविध स्पर्धा, शिक्षकांचे कला सादरीकरण आणि शहरातील गायकांनी गीते सादर करुन शिक्षकांना आनंद दिला.
शहरातील गायक सागर मधुमटकेने किशोरकुमार व मो. रफी यांची गीता सादर करुन शिक्षकांना आनंद दिला. ‘आ चल के तुझे मै ले के चलू.., ये श्याम मस्तानी...निले निले अंबर पे...’ आदी गीतांंनी यावेळी सागरने रंगत वाढविली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पेस आयआयटी मेडिकलचे संचालक अतुल यमसनवार, संचालक मुकेश मालविया, संचालक प्रदीप आठवले, अकॅडमीचे प्रमुख अनुराग वाजपेयी, हरिओम पुनियानी, लोकमतचे संपादक दिलीप तिखिले यावेळी उपस्थित होते. अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन लोकमत सखी मंच संयोजिका नेहा जोशी यांनी केले.
याप्रसंगी पेस आयआयटीचे प्रेझेन्टेशन प्रोजेक्टरच्या साहाय्याने करण्यात आले. यावेळी मालविया यांनी हुशार आणि पात्र विद्यार्थ्यांना ओळखून त्यांना आयआयटी साठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन उपस्थित शिक्षकांना केले.
शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विशेष मनोरंजक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात सांस्कृतिक कार्यक्रमांसह वन मिनिट गेम शो, मनोरंजक प्रश्नोत्तरी, गीत संगीत, नृत्य, विनोद आदींचे आयोजन होते. या सर्व स्पर्धात आणि सादरीकरणात शिक्षकांनी उत्साहाने सहभाग घेतला. नृत्य स्पर्धेत शिक्षिका आघाडीवर होत्या. रंगारंग कार्यक्रमात शिक्षक हास्यविनोदात रंगले होते. स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमात शासनातर्फे २०१४-१५ चा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त मेजर हेमंत जकाते विद्यानिकेतच्या माला चिलबुले, भिडे गर्ल्स हायस्कूलच्या डॉ. मंगला गावंडे, नचिकेत अवॉर्डने सन्मानित अनुराग पांडे, सावित्रीबाई फुले अवॉर्ड प्राप्त हिदू मुलींच्या शाळेच्या सीमा फडणवीस यांना शाल, श्रीफळ व स्मतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यासह कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांची शाळा, हिंदू मुलींची शाळा, राजकुमार केवलरामानी हायस्कूल, दीनानाथ हायस्कूल, अभियांत्रिकी महाविद्यालय, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, रविनाथ हायस्कूल, शिवनाथ हायस्कूल आदी शाळांच्या शिक्षकांना स्मृतिचिन्ह प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. (प्रतिनिधी)