लैंगिक अत्याचार की सेमिनारसाठी पैशांची मागणी? नागपूर विद्यापीठाने नेमली चौकशी समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2022 02:23 PM2022-03-15T14:23:07+5:302022-03-15T14:34:00+5:30
पीएच.डी.साठी संशोधन आणि विषयाचा आराखडा सादर करण्यासाठी हिंदी विभागातील एका प्राध्यापकांनी आपल्याला अपमानास्पदरीत्या वागणूक देत मानसिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून छळ केल्याचा पीडित विद्यार्थिनींनी आरोप केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील हिंदी विभागातील प्राध्यापकाने पीएच.डी. नोंदणी करणाऱ्या दोन विद्यार्थिनींकडे पैशांची मागणी करून मानसिक छळ केल्याचा आरोप झाला आहे. या मुलींचा लैंगिक अत्याचार झाल्याचादेखील आरोप काही प्राधिकरण सदस्यांनी केला; परंतु विद्यापीठाकडे झालेल्या लेखी तक्रारीत लैंगिक अत्याचाराचा उल्लेखदेखील नाही. त्यामुळे या प्रकरणातील नेमके तथ्य काय यातील गूढ वाढले आहे. दुसरीकडे या प्रकरणाच्या चौकशीसाठी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी चौकशी समिती स्थापन केली आहे.
पीएच.डी.साठी संशोधन आणि विषयाचा आराखडा सादर करण्यासाठी हिंदी विभागातील डॉ. मनोज पांडे आपल्याला अपमानास्पदरीत्या वागणूक देत मानसिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून छळ केल्याचा पीडित विद्यार्थिनींनी आरोप केला. डॉ. पांडे यांनी आराखड्यावर स्वाक्षरी करायला नकार दिला व विभागाच्या कार्यक्रमासाठी पाचशे रुपयांची मागणी केल्याचादेखील दावा या मुलींनी केला. सिनेटच्या सभेतदेखील हा मुद्दा उपस्थित झाला होता व लैंगिक छळ झाल्याचा आरोप काही सदस्यांकडून करण्यात आला. मात्र, विद्यार्थी कल्याण संचालकांकडे झालेल्या तक्रारीत लैंगिक छळाचा मुद्दाच नाही. अशा स्थितीत नेमकी स्थिती तपासण्यासाठी कुलगुरूंनी चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये सेवानिवृत्त न्यायाधीश, विषयतज्ज्ञ राहतील, असे डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी डॉ.मनोज पांडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
डिसेंबरच्या घटनेची तक्रार मार्चमध्ये का ?
पीएच.डी.च्या सिनॉप्सिसमध्ये एखादा विषय योग्य वाटत नसेल तर त्याच्या त्रुटी दूर करण्याची संधी दिली जाते. ते रेफरबॅक झाले व त्यातून विद्यार्थिनींचा गैरसमज झाला असण्याची शक्यता आहे. आरएसीच्या बैठका डिसेंबरमध्ये झाल्या. त्याची तक्रार पाच मार्च रोजी कशी काय झाली ही बाब आश्चर्यजनक आहे. इतक्या उशिरा तक्रार का झाली याची चौकशीदेखील करू, असे कुलगुरूंनी सांगितले.
'त्या' ५०० रुपयांची अधिकृत नोंद
विद्यापीठातील विभागांतर्फे नियमितपणे विविध सेमिनार व कार्यशाळांचे अनेकदा विद्यार्थ्यांकडूनच आयोजन करण्यात येत असते. अशाच एका उपक्रमासाठी या विद्यार्थिनींकडून ५०० रुपये मागण्यात आल्याचे तक्रारीवरून दिसून येत आहे. त्यांनी जे पैसे दिले त्याची विभागाकडे अधिकृत नोंद आहे. त्यामुळे त्याला गैरव्यवहारदेखील म्हणता येणार नाही. तक्रार खरी आहे की खोटी याचीदेखील चौकशी समिती सखोल तपास करेल. जो दोषी असेल त्यावर निश्चित कारवाई करू, असे कुलगुरूंनी सांगितले.
शिक्षण मंचाने केली कारवाईची मागणी
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून तातडीने दोषींवर कारवाई करण्याची मागणी विद्यापीठ शिक्षण मंचने केली आहे. या प्रकरणात डॉ. मनोज पांडे या कारणे दाखवा नोटीस बजावण्यात का आलेली नाही, असा सवालदेखील उपस्थित केला. यावेळी शिक्षण मंचच्या अध्यक्षा डॉ. कल्पना पांडे, डॉ. संतोष कसबेकर प्रामुख्याने उपस्थित होते.