प्रवेश हवाय, घरमालकाचा भाडेकरार आणा; शिक्षण उपसंचालकांचा अफलातून आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 10:31 AM2018-03-23T10:31:54+5:302018-03-23T10:32:04+5:30
ज्या भाडेकरू पालकांच्या पाल्याचा आरटीईत नंबर लागला आहे. त्यांना प्रवेश घेताना दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरारनामा कागदपत्रांसोबत जोडायचा आहे. त्याशिवाय प्रवेश देण्यात येऊ नये, असा आदेश शिक्षण उपसंचालकांनी काढला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ज्या भाडेकरू पालकांच्या पाल्याचा आरटीईत नंबर लागला आहे. त्यांना प्रवेश घेताना दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरारनामा कागदपत्रांसोबत जोडायचा आहे. त्याशिवाय प्रवेश देण्यात येऊ नये, असा आदेश शिक्षण उपसंचालकांनी काढला आहे. मुळात अनेक भाड्याने राहणाऱ्या पालकांना नोंदणीकृत भाडेकरारनामा मिळणे शक्य नसल्याने, अशा पालकांची चांगलीच गोची होत आहे.
आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. लॉटरीच्या सोडतीनंतर विद्यार्थ्यांचे शाळेत प्रवेश घेणे सुरू आहे. परंतु भाड्याने राहणाऱ्या पालकांची शिक्षणाधिकारी कार्यालयात गर्दी होत आहे. शिक्षण उपसंचालकांनी काढलेल्या पत्रामुळे नोंदणीकृत भाडेकरारनामा नसलेल्या पालकांना शाळा प्रवेश देण्यास नकार देत आहे. त्यामुळे आरटीईत नंबर लागूनही प्रवेश मिळणार नाही अशी भिती पालकांना सतावत आहे. किरायाने राहणाºया ९० टक्के पालकांना अधिकृत भाडे करारनामा मिळविणे कठीण आहे. अधिकृत करारनाम्यासाठी घरमालकांची परवानगी गरजेची आहे. परंतु घरमालक त्यास नकार देत आहेत. पालक भाडे करारनामा करण्यासाठी पैसेही खर्च करण्यास तयार आहेत. पण घरमालकांचा नकार असल्याने ते हतबल झाले आहेत. पहिल्या सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दोनच दिवस शिल्लक आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी कार्यालयात पालकांची गर्दी वाढली आहे.
परंतु २३ मार्च २०१७ ला शिक्षण संचालक (प्राथमिक) गोविंद नांदेडे यांनी काढलेल्या पत्रात स्पष्ट उल्लेख आहे की, ज्या पालकांकडे आधारकार्ड, निवडणुक ओळखपत्र, भाड्याची पावती यापैकी कोणताही एक पुरावा असेल तर प्रवेश द्यावा. जर पुरावा नसेल तर दुय्यम निबंधक कार्यालयातून अधिकृत भाडे करारनामा आवश्यक आहे. यावेळी मात्र दुय्यम निबंधक कार्यालयाचा अधिकृत भाडे करारनामा प्रवेशासाठी अधिकृत मानला गेल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार आहे.