जेट एअरवेजच्या पुनरुज्जीवन वृत्तामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:06 AM2021-06-23T04:06:40+5:302021-06-23T04:06:40+5:30
मेहा शर्मा नागपूर : लंडनस्थित कलरॉक कॅपिटल आणि युएई-आधारित व्यापारी मुरारीलाल जालान यांनी संयुक्तरीत्या सादर केलेल्या जेट एअरवेजच्या पुनरुज्जीवन ...
मेहा शर्मा
नागपूर : लंडनस्थित कलरॉक कॅपिटल आणि युएई-आधारित व्यापारी मुरारीलाल जालान यांनी संयुक्तरीत्या सादर केलेल्या जेट एअरवेजच्या पुनरुज्जीवन योजनेस मंगळवारी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलने (एनसीएलटी) मान्यता दिली. या निर्णयामुळे जेट एअरवेजचे सध्या कार्यरत व माजी कर्मचारी आणि एव्हिएशन उद्योगात उत्साह वाढला आहे. पुनरुज्जीवनाचे कौतुक करणारे कार्यरत कर्मचारी व माजी कर्मचाऱ्यांनी लोकमतशी संवाद साधला.
जेट एअरवेजच्या महाराष्ट्र क्षेत्राचे प्रमुख अहमद जलील म्हणाले, ही खूप सकारात्मक बातमी आहे. विमान उद्योगाच्या इतिहासात एअरलाईन्सचे पुनरुज्जीवन होण्याची ही पहिलीच वेळ आहे. जेट एअरवेजचे २० हजार कर्मचारी होतो. हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी किती सकारात्मक ठरेल हे नव्या व्यवस्थापनाच्या धोरणावर अवलंबून राहील. सध्याच्या परिस्थितीत ते कसे व्यवहार करतील, तेही लवकरच कळेल. एअरलाईन्सच्या वाढीसाठी प्रशिक्षित आणि अनुभवी मनुष्यबळ आवश्यक असते आणि जेटकडे सर्वोत्कृष्ट होते.
जेट एअरवेज नागपूरचे माजी विमानतळ व्यवस्थापक राधेश्याम शर्मा म्हणाले, याचा फायदा संपूर्ण उद्योगाला होईल. तथापि, भारतात सर्वात कमी प्रीमियम क्लास उड्डाण करणारे लोक असल्यामुळे उड्डाण करणाऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा होईल. केवळ इतर प्रीमियम एअरलाईन्स व्हिस्टारा असून त्यांच्या विमान सेवेत बऱ्याच भागांचा समावेश नाही. पुनरुज्जीवन झाल्यावर ही गॅप भरून निघेल. त्यामुळे पुन्हा एकदा निकोप स्पर्धा निर्माण होईल. तिकीट, सेवा या सर्वांच्या किमतींवर परिणाम होईल. एअरलाईन्स बंद झाल्यानंतर बऱ्याच कर्मचाऱ्यांना तडजोडी करावी लागत होती. एकदा पुनरुज्जीवन झाले की आम्ही परत मुख्य प्रवाहात येऊ. सध्याच्या कर्मचाऱ्यांना मागील फेब्रुवारीपासून पगार मिळाला नाही. ते नवीन व्यवस्थापनाच्या निर्देशाच्या प्रतीक्षेत आहेत.
जेट एअरवेज वरिष्ठ सीएसए अमनप्रीत योगेश खंडेलवाल म्हणाले, निर्देश येईपर्यंत काहीही स्पष्ट नाही. व्यवस्थापनाकडून बातमी मिळेपर्यंत भविष्यातील घडामोडींवर भाष्य करू शकत नाही. खूप प्रतीक्षा केली आहे. व्यवस्थापनाकडून आशा आहे. अनेक कर्मचारी ब्रँडवरील निष्ठा आणि विश्वासामुळे जेटशी जुळले आहेत. नागपूरहून पहिल्या विमानाच्या स्वागतासाठी आतूरतेने वाट पाहत आहोत.