शिथिलतेनंतर बाजारपेठेत उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:07 AM2021-06-02T04:07:28+5:302021-06-02T04:07:28+5:30

नागपूर : जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, फार्मसी वगळता एप्रिल महिन्यात वेळेचे निर्बंध आणि मे महिन्यात पूर्णत: बंद असलेल्या बाजारपेठा आता ...

Enthusiasm in the market after the slump | शिथिलतेनंतर बाजारपेठेत उत्साह

शिथिलतेनंतर बाजारपेठेत उत्साह

Next

नागपूर : जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, फार्मसी वगळता एप्रिल महिन्यात वेळेचे निर्बंध आणि मे महिन्यात पूर्णत: बंद असलेल्या बाजारपेठा आता ब्रेक द चेन अंतर्गत सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जवळपास दोन महिन्यानंतर १ जूनपासून दुकाने उघडल्याने बाजारात अर्थचक्र पुन्हा सुरू झाले आहे. दुकाने उघडल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साह आहे. पहिल्या दिवशी खरेदीसाठी बाजारात गर्दी दिसून आली.

सक्करदरा, महाल, इतवारी, गांधीबाग, सीताबर्डी, धरमपेठ, कमाल चौक, खामला, जरीपटका येथील सराफा, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक्स, कापड, हार्डवेअर बाजारपेठा आणि नागपुरातील सर्वच वस्त्या व रस्त्यांवरील दुकाने सुरू झाल्याने आर्थिक नुकसानीत असलेल्या व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. दुकाने काही तासांसाठी सुरू ठेवण्याची व्यापाऱ्यांची पूर्वीपासूनच मागणी होती. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे शासनाने दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली नव्हती. पण आता दुकाने सुरू झाल्याने व्यवसायाला चालना मिळेल, असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

सोना-चांदी ओळ कमिटीचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम कावळे म्हणाले, वेळेच्या निर्बंधांतर्गत दुकाने सुरू झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साह आहे. पूर्वीचे नुकसान कधीही भरून निघणार नाही, पण व्यापारी आणि कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

गांधीबाग होलसेल क्लॉथ मार्केटचे माजी अध्यक्ष अजय मदान म्हणाले, पहिल्याच दिवशी बाजारात गर्दी होती. दुकानदारांनी सोशल डिस्टन्सिंग व मास्कचे पालन केले. दुकाने सुरू झाल्याने अर्थचक्र सुरू झाले आहे. व्यापाऱ्यांमध्ये उत्साह आहे.

सीताबर्डीतील दुकानदार संघाचे हुसेन अजानी म्हणाले, दोन महिन्यानंतर मार्केट सुरू झाल्याने व्यापारी आनंदी आहेत. दुकाने २ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने ग्राहकांची संख्या कमी राहील. व्यवसाय सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागतील.

ऑटोमोबाईल व्यावसायिक विजय आमधरे म्हणाले, दुकाने सुरू झाल्याने उत्साह आहे. व्यवसाय सुरळीत होण्यास काही दिवस लागणार आहेत. पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात ग्राहक आले. शासकीय नियमांचे पालन करण्यात येत आहे. हार्डवेअर विक्रेते राकेश माटे म्हणाले, अनेक दिवस दुकाने बंद राहिल्याने आर्थिक नुकसान झाले. अनेकांची बांधकामे बरीच दिवस थांबल्याने पहिल्याच दिवशी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. पुढे व्यवसायाला गती येणार आहे.

Web Title: Enthusiasm in the market after the slump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.