नागपूर शहरात घरगुती गणपतीच्या विसर्जनाला दुपारपासून उत्साह
By मंगेश व्यवहारे | Published: September 28, 2023 04:10 PM2023-09-28T16:10:44+5:302023-09-28T16:11:17+5:30
मंडळाच्या गणपतींच्या मिरवणूकी निघणार दुपारी ४ नंतर
नागपूर : अनंत चतुर्थी गणरायाला निरोप देण्याचा म्हणजे विसर्जनाचा दिवस. शहरात दुपारपासून घरगुती गणपतीचे विसर्जन उत्साहात सुरू झाले. महापालिकेने शहरातील तलावात विसर्जन करण्यास निर्बंध घातल्याने २११ विसर्जनस्थळी एकूण ४१३ कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. या कृत्रिम तलावांमध्ये गणेशभक्त मोठ्या श्रद्धेने बाप्पाचे विसर्जन करीत आहे.
विसर्जन स्थळांवर महापालिकेचे कर्मचारी व पर्यावरणवादी संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित असून, बाप्पांचे निर्माल्य संकलित करून ते निर्माल्य कलशात टाकत आहे. शहरातील फुटाळा चौपाटी, अंबाझरी तलाव, गांधीसागर, सक्करदरा, नाईक तलाव यासह शहरातील विविध चौकांमध्ये देखील कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहे.
या विसर्जन स्थळांवर विसर्जनासाठी आलेल्या भक्तांकडून आरत्यांचा गजर व प्रसादाचेही वितरण करण्यात येत आहे. दुपारी ४ नंतर शहरात मंडळांच्या गणपती विसर्जनाच्या मिरवणूका निघणार आहे. ४ फुटाच्या आतील गणेशाच्या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात येत आहे. परंतु त्यापेक्षा उंच मूर्तीच्या विसर्जनासाठी कोराडी येथे व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर महापालिकेने १९ फिरत्या कृत्रिम विसर्जन तलावांची देखील व्यवस्था केली आहे.