हुश्श... लस मिळाली चिंता मिटली; १५ वर्षांवरील लसीकरणाची उत्साहात सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 09:07 PM2022-01-03T21:07:00+5:302022-01-03T21:07:45+5:30
Nagpur News कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने वाढविलेल्या चिंतेच्या वातावरणात १५ ते १८ वर्षे वयोगटांतील मुला-मुलींच्या लसीकरणाला सोमवारी उत्साहात प्रारंभ झाला.
नागपूर : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने वाढविलेल्या चिंतेच्या वातावरणात १५ ते १८ वर्षे वयोगटांतील मुला-मुलींच्या लसीकरणाला सोमवारी उत्साहात प्रारंभ झाला. शहरात ८,०३९, तर ग्रामीणमधील ६,६१५ असे एकूण १३,४५३ मुला-मुलींनी लस घेतली. लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांनी लसीकरण करण्याचे आवाहनही केले.
कोरोनाचा तिसऱ्या लाटेचा वेग हळूहळू वाढत आहे. ओमायक्रॉनच्या व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून हाती घेण्यात आलेल्या १५ वर्षांवरील विद्यार्थ्यांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरात महापौर दयाशंकर तिवारी यांनी राजकुमार गुप्ता समाजभवन बजेरिया व सेंट उसूर्ला गर्ल्स हायस्कूल, सिव्हिल लाईन्स येथे भेट देत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला, तर ग्रामीणमध्ये कांद्री येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी केंद्राचे उद्घाटन करून मोहिमेला सुरुवात केली.
- ११८ केंद्रांवर लसीकरण
शहरात मनपातर्फे २० स्थायी व ३३ शाळा-महाविद्यालयांमध्ये, तर ग्रामीणमध्ये ५३ व १२ ग्रामीण रुग्णालयांमधील असे एकूण ११८ केंद्रांवर मुला-मुलींच्या लसीकरणाचे विशेष नियोजन करण्यात आले होते. या सर्वच केंद्रांवर सकाळच्यावेळी गर्दी दिसून आली. दुपारनंतर ही गर्दी ओसरली असली तरी विद्यार्थ्यांमधील उत्साह कायम होता.
-लसीकरणासाठी लागली रांग
मनपाचे जाटतरोडी येथील आयसोलेशन हॉस्पिटल, गांधीनगर येथील मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय, कामठी रोड येथील डॉ. आंबेडकर रुग्णालय, शिवाजी विज्ञान महाविद्यालय, दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, न्यू सुबेदार येथील गजानन स्कूल येथे विद्यार्थ्यांची रांग लागली होती. परंतु, यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आधीच ऑनलाईन नोंदणी केली होती. यामुळे अनेकांना फार वेळ रांगेत उभे राहावे लागले नाही.