संपूर्ण कुटुंबालाच लागला संस्कृतचा लळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 01:09 AM2019-07-07T01:09:22+5:302019-07-07T01:13:10+5:30

संस्कृत ही देवभाषा आहे, महान अशा वेदपुराणांची प्राचीन भाषा आहे, असे आपण अभिमानाने सांगतो. पण शिकणे व शिकविण्यापुरते सोडले तर या भाषेत संवाद साधणारे शोधूनही सापडणार नाही. म्हणून ती संवादाची भाषा नाही, असे बोलले जाते. पण संस्कृत सुद्धा संवादाची भाषा होऊ शकते, ही गोष्ट तात्या टोपेनगरच्या प्रा. अच्युत विश्वरुपे यांच्या कुटुंबाने सिद्ध केली आहे. त्यांची दोन मुले, सुना, तीन नातवंड आपसात केवळ संस्कृतमध्येच संवाद साधतात. आबांच्या प्रेमळ प्रभावाने सर्वांना संस्कृतचा लळा लागला. ते आपसात इतके सहज बोलतात की ‘संस्कृत बोलणारे कुटुंब’ अशी त्यांची ख्याति झाली आहे.

The entire family speak in Sanskrit | संपूर्ण कुटुंबालाच लागला संस्कृतचा लळा

संपूर्ण कुटुंबालाच लागला संस्कृतचा लळा

googlenewsNext
ठळक मुद्देआपसातील संवाद संस्कृतमध्येच : विश्वरुपे कुटुंबाने जपली देवभाषेची ओळख

निशांत वानखेडे/लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संस्कृत ही देवभाषा आहे, महान अशा वेदपुराणांची प्राचीन भाषा आहे, असे आपण अभिमानाने सांगतो. पण शिकणे व शिकविण्यापुरते सोडले तर या भाषेत संवाद साधणारे शोधूनही सापडणार नाही. म्हणून ती संवादाची भाषा नाही, असे बोलले जाते. पण संस्कृत सुद्धा संवादाची भाषा होऊ शकते, ही गोष्ट तात्या टोपेनगरच्या प्रा. अच्युत विश्वरुपे यांच्या कुटुंबाने सिद्ध केली आहे. त्यांची दोन मुले, सुना, तीन नातवंड आपसात केवळ संस्कृतमध्येच संवाद साधतात. आबांच्या प्रेमळ प्रभावाने सर्वांना संस्कृतचा लळा लागला. ते आपसात इतके सहज बोलतात की ‘संस्कृत बोलणारे कुटुंब’ अशी त्यांची ख्याति झाली आहे.
सध्या कुटुंबात सर्रासपणे इंग्रजीत बोलण्याचे फॅड आहे. पण तोच जर कुणी संस्कृतमध्ये बोलत असेल तर त्याला ‘वेडेपणा’ समजला जातो. पण इतर भाषिक लोक त्यांच्या भाषेत बोलतात, तेव्हा आपण संस्कृतमध्ये बोललो तर काय वेगळेपणा, अशी ठाम भूमिका प्रा. विश्वरुपे मांडतात. तशी त्यांची संस्कृतच्या आग्रहाची गोष्टही मजेशीर आहे. प्रा. अच्युत विश्वरुपे हिस्लॉप कॉलेजमध्ये इतिहासाचे प्राध्यापक होते. १९६५ सालची गोष्ट. त्यावेळी कुण्या एका सहकाऱ्याने त्यांना ‘संस्कृत ही मृतभाषा आहे’, असे म्हटले. त्यावर आक्षेप घेत, हे वक्तव्य खोटे ठरविण्यासाठी त्यांनी स्वत:पासून संस्कृतमध्ये संवाद साधण्याचा निर्धार केला. पण त्यांना संस्कृत येत नव्हती. त्यामुळे त्यावेळी सीताबर्डी येथे संस्कृत प्रचारिणीमार्फत संस्कृतचे वर्ग घेणारे के.रा. जोशी यांच्याकडे संस्कृत शिकण्याचा आग्रह धरला. त्यावेळी मोठा मुलगा मल्हार याचा जन्म झाला होता. जोशी यांच्याकडे एकेक वाक्य शिकून ते मुलासोबत संवाद साधायचे. आपण अपुरे पडतो ही भावना आल्यानंतर त्यांनी संस्कृतमध्ये एम.ए.च्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला व दोन वर्षात तो पूर्ण केला.
प्रा. विश्वरुपे यांना दोन मुले झाली. त्या दोघांशीही घरी, बाहेर फिरायला जाताना ते संस्कृतमधूनच संवाद साधायचे. त्यांच्या या प्रयत्नात पत्नी नंदा यांनी मोलाची साथ दिली. मात्र मुलांना बाहेर संवाद साधायला अडचण येऊ नये म्हणून आई मराठीतूनच बोलायची. त्यामुळे घरी व बाहेर संवाद साधताना दोन्ही भाषेचा समतोल साधला गेला. त्यांची अ‍ॅड. मल्हार व शशांक ही दोन्ही मुले पित्याकडून मिळालेल्या संस्कारामुळे सुंदरपणे संस्कृतमध्ये संवाद साधतात. बालपणापासून हे घडत असल्याने मुलांना आपण वेगळ्या भाषेत बोलतो, असे वाटलेच नाही. अ‍ॅड. मल्हार सांगतात की, मराठी ही मातृभाषा तर संस्कृत ही आमची पितृभाषा आहे. वडिलांची ही भाषिक देण पुढेही समर्थपणे चालविण्याचा निर्धार व्यक्त केला.

सुना व नातवंडांनीही स्वीकारला वसा
 पत्नी व मुलांचे ठीक आहे, पण खरी अडचण तर मुलांच्या लग्नानंतर होती. प्राध्यापकांनी कधी सुनांवर बंधन घातले नाही. मात्र अ‍ॅड. मल्हार यांची पत्नी शिल्पा व शशांक यांची पत्नी सुवर्णा या दोघींनीही या कुटुंबाचे हे वेगळेपणे प्रेमाने स्वीकारले व त्याही या भाषेच्या रंगात रंगल्या. एका सुनेने तर लग्नानंतर संस्कृतमध्ये एमए करून घेतले. पुढे मुलांप्रमाणे नातवंडांसोबतही आबांची ट्युनिंग जुळली. त्यामुळे अ‍ॅड. विक्रांत, पिनाक व डॉ. ऐश्वर्या ही तिन्ही नातवंड संस्कृतमध्ये अतिशय सहज संवाद साधतात.

असंख्य गमतीदार प्रसंग
 एकदा नात ऐश्वर्या हिने शाळेत मानेचे दुखणे ‘मम ग्रीवाय: पीडा भवति’,असे संस्कृतमध्ये शिक्षिकेला सांगितले. त्यावेळी शिक्षिकेने घरी फोन करून काय झाले, असे विचारले होते. असे कुटुंबात, समाजात, प्रवासात घडलेले असंख्य प्रसंग घरच्यांनी सांगितले. मुलांचे व नातवांचे अनेकदा कौतुकही झाले. प्राध्यापकांचा या निश्चयासाठी सन्मानही झाला, पण अनेकांनी त्यांना वेडाही म्हटले. पण प्रा. विश्वरुपे व त्यांच्या कुटुंबाने संस्कृतप्रेम सोडले नाही.

Web Title: The entire family speak in Sanskrit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.