बंगालचा संपूर्ण फोकस नंदीग्रामवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:07 AM2021-03-31T04:07:50+5:302021-03-31T04:07:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदीग्राम - पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील नंदीग्राम येथे सर्वात हायप्रोफाईल लढत होत आहे. मुख्यमंत्री ममता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदीग्राम - पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील नंदीग्राम येथे सर्वात हायप्रोफाईल लढत होत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तेथून लढत असून, त्यांच्यासमोर तृणमूलचे माजी नेते व आता भाजपचे उमेदवार असलेले शुभेंदू अधिकारी यांचे तगडे आव्हान आहे. बंगालच्या राजकारणात या लढतीला दीदी विरुद्ध दादा असे संबोधल्या जात असून, दोन्ही पक्षांसाठी ही प्रतिष्ठेची लढत झाली असून, १ एप्रिल रोजी दोन्ही उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद होईल.
मागील निवडणुकीत ममता यांनी भवानीपूर येथून निवडणूक जिंकली होती. मात्र यावेळेस त्यांनी नंदीग्राममधून उभे राहण्याचा निर्णय घेतला. तृणमूलमधील त्यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी शुभेंदू अधिकारी यांना भाजपने त्या जागेवरून मैदानात उतरवले. नंदीग्राम व आजूबाजूच्या भागात अधिकारी कुटुंबीयांचा अनेक वर्षांपासून दबदबा आहे. त्यांचे वडील शिशिर अधिकारी हे तीनवेळा तेथून खासदार होते व संपुआ सरकारमध्ये मंत्रीदेखील होते. स्वतः शुभेंदू १९९५ पासून राजकारणात सक्रिय आहेत. २००६ मध्ये ते तृणमूलच्या तिकिटावरून कंथी येथून जिंकून आले होते. तर २००९ व २०१४ मध्ये ते लोकसभेत निवडून गेले होते. २०१६ च्या निवडणुकीत नंदीग्राममधून ते जिंकले होते. अधिकारी कुटुंबामुळेच संबंधित भागात तृणमूलला बळकटी मिळाली होती.
या जागेवरून ममता लढत असल्या तरी प्रत्यक्षात त्या प्रचाराला पूर्णवेळ देऊ शकल्या नव्हत्या. मात्र या लढतीचे महत्त्व लक्षात घेता, मागील काही दिवसापासून त्यांच्यासह तृणमूलचे मोठे नेते या भागात प्रचार करत आहेत. तर अधिकारी यांच्या प्रचारासाठी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मोठे नेते उतरले.
नंदीग्राममुळे ममतांचा वाढला जनाधार
२००७ साली नंदीग्राममध्ये तृणमूलतर्फे भूमी अधिग्रहण विरोधातील आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनानंतर ममतांचा जनाधार वाढला होता. अधिकारी कुटुंबीयांनी त्यात मोठी भूमिका पार पाडली होती. १४ वर्षांनंतर त्याच अधिकारी कुटुंबातील सदस्याविरोधात ममतांना निवडणूक लढवावी लागत आहे. या निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीला नंदीग्राम येथेच ममता यांचा अपघात झाला व त्यांच्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर त्या व्हीलचेअरवरूनच प्रचार करत आहेत. भाजपनेच हा हल्ला केल्याचा त्यांनी आरोप केला होता.