अन्न प्रक्रिया उद्योगातील संधीचा लाभ उद्योजकांनी घ्यावा :देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:31 AM2019-01-17T00:31:32+5:302019-01-17T00:32:55+5:30
अन्न प्रक्रिया उद्योगातील उत्पादनांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर संधी असून, राज्यात या उद्योगांच्या विकासासोबत गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. उद्योजकांनी या क्षेत्रात गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अन्न प्रक्रिया उद्योगातील उत्पादनांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर संधी असून, राज्यात या उद्योगांच्या विकासासोबत गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. उद्योजकांनी या क्षेत्रात गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मिहान येथील आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरच्या नियोजित जागेवर विदर्भ इंडस्ट्रीज असोशिएशनतर्फे (व्हीआयए) १६ ते १८ जानेवारीपर्यंत आयोजित पहिल्या फूड इंडिया शोचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बुधवारी झाले. याप्रसंगी व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे, केंद्रीय सहसचिव व्ही. राधा, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, व्हीआयए अन्न प्रक्रिया फोरमचे अध्यक्ष अरुण खोब्रागडे, सचिव डॉ. सुहास बुधे, किरण पातूरकर आणि मराठवाडा इंडस्ट्रीजचे माजी अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते. फूड शोमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुमारे १०० कंपन्यांचा सहभाग असून, अन्न प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक असलेली यंत्रसामुग्री उद्योजकांसाठी प्रदर्शित करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रदर्शन दालनाला भेट देऊन उत्पादक कंपन्यांसोबत यावेळी संवाद साधला.
मुख्यमंत्री म्हणाले, देशामध्ये प्रक्रिया न केल्यामुळे अन्न खूप मोठ्या प्रमाणावर वाया जाते. भारताने अन्नावर प्रक्रिया करून ते त्याची निर्यात केल्यास देश जगातील सर्वात मोठ्या फूड मार्केटमध्ये सहभागी होऊन आपला दबदबा निर्माण करू शकतो. अन्न प्रकिया उद्योगनिर्मिती प्रक्रियेच्या पॉलिसीमध्ये मराठवाडा आणि विदर्भाला झुकते माप देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
राज्य शासनाने विदर्भ व मराठवाड्यातील उद्योगाला चालना देण्यासाठी कमी दरात वीज उपलब्ध करून दिली आहे. अजून पाच वर्षे दोन्ही विभागांमध्ये विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मराठवाडा व विदर्भाचा एक अहवाल तयार करण्यात आला असून, या अहवालातील सूचनांवर लक्ष देणार आहे. एसएमई व बँक यामधील सेतू म्हणून विभागीय आयुक्तांनी काम करावे आणि एसएमर्इंना प्रोत्साहन द्यावे. उद्योग विकासासाठी केलेल्या सूचना निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. या अहवालाच्या अभ्यासासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठित करण्यात येईल व त्यानुसार अंमलबजावणीला प्राधान्य देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभियानांतर्गत ५९ मिनिटांत कर्ज या योजनेंतर्गंत अन्न प्रक्रिया उद्योगातील नवउद्योजकांना विविध बँकांतर्फे मंजूर केलेल्या ४०५ उद्योगांना १०० कोटींच्या धनादेशांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.