'वैद्यकीय उपकरण निर्मितीत उद्योजकांनी पुढाकार घ्यावा'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2021 05:58 PM2021-10-19T17:58:07+5:302021-10-19T18:46:41+5:30
देशातील उद्योजकांनी या क्षेत्रात प्रवेश करून जागतिक दर्जाच्या व कमी किमतीतील वैद्यकीय उपकरणांची निर्मिती करावी, असे मत केंद्रीय रस्ते, महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वैद्यकीय उपकरण निर्मिती क्षेत्रात आपण माघारलो असून ५० हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची वैद्यकीय उपकरणे आपल्याला आयात करावी लागतात. यासाठी देशातील उद्योजकांनी या क्षेत्रात प्रवेश करून जागतिक दर्जाच्या व कमी किमतीतील वैद्यकीय उपकरणांची निर्मिती करावी, असे मत केंद्रीय रस्ते, महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी व्यक्त केले.
‘कॅथलॅब मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी’च्या उद्घाटनच्या आभासी कार्यक्रमात गडकरी बोलत होते. वैद्यकीय उपकरण निर्मितीच्या क्षेत्रात अधिक संशोधनाची आवश्यकता आहे; पण अशा संशोधन करणाऱ्या संस्थांची आमच्याकडे कमतरता आहे. आज अनेक जिल्ह्यांत कॅथलॅब नाही. तालुका स्तरावर जे डॉक्टर काम करीत आहेत, त्यांच्याकडे चांगल्या दर्जाची वैद्यकीय उपकरणे उपलब्ध झाली तर कमी पैशांत गरीब रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध होतील आणि ही उपकरणे बनविणाऱ्या संस्थांमध्ये काम करणाऱ्यांना रोजगार उपलब्ध होईल, असे ते म्हणाले.
जागतिक दर्जाचे उत्पादन आणि किमतीत परवडणारे असेल तर जागतिक बाजारातही आपल्या उत्पादनाला मागणी अधिक येईल. वैद्यकीय उपकरणे निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी वित्तपुरवठा करणारी स्वत:ची संस्थाही सुरू करावी व त्या माध्यमातून उपकरणे खरेदी करणाऱ्या डॉक्टरांना वित्तपुरवठा उपलब्ध करून द्यावा; यामुळे उपकरणे डॉक्टरांना खरेदी करणे शक्य होईल. दहा-पंधरा उद्योजकांनी एकत्र येऊन मोठा ‘मेडिकल डिव्हाईस पार्क’ उभा करावा, असेही ते म्हणाले.