अतिक्रमण,चोरी, खुनांच्या घटनांनी उद्योजक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 10:21 PM2019-08-06T22:21:47+5:302019-08-06T22:23:22+5:30
एमआयडीसी हिंगणा परिसरात वाढते अतिक्रमण, चोरी आणि खुनांच्या घटनांनी उद्योजक त्रस्त आहेत. यावर काटेकोर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी चेकपोस्ट वाढवावी, अशी मागणी एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे (एमआयए) अध्यक्ष चंद्रशेखर शेगांवकर यांनी पोलीस सहायक आयुक्त सिद्धार्थ शिंदे यांच्याकडे केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एमआयडीसी हिंगणा परिसरात वाढते अतिक्रमण, चोरी आणि खुनांच्या घटनांनी उद्योजक त्रस्त आहेत. यावर काटेकोर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी चेकपोस्ट वाढवावी, अशी मागणी एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे (एमआयए) अध्यक्ष चंद्रशेखर शेगांवकर यांनी पोलीस सहायक आयुक्त सिद्धार्थ शिंदे यांच्याकडे केली. याप्रसंगी एमआयएचे माजी अध्यक्ष कॅ. सी.एम. रणधीर उपस्थित होते.
एमआयएतर्फे एमआयडीसी येथील असोसिएशनच्या सभागृहात आयोजित बैठकीत शेगांवकर यांनी एसीपी सिद्धार्थ शिंदे, पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर यांना हिंगणा औद्योगिक परिसरात घडणाऱ्या घटनांची माहिती दिली. सध्या कारखान्यांमध्ये चोरी, परिसरात खून आणि अवैध घटना घडत असल्याचे सांगितले.
सचिव सचिन जैन म्हणाले, इलेक्ट्रॉनिक्स झोनमधील महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. पोलिसांना ग्रस्त घालण्याची जास्त गरज आहे. शेगांवकर म्हणाले, एमआयडीसी परिसरात अवैध ट्रक पार्किंगची समस्या वाढली असून, ट्रक अनेक महिने एकाच ठिकाणी उभे राहतात. त्यामुळे या भागातील ट्रक आणि गाड्यांच्या वाहतुकीला अडचण निर्माण होते. अनेकदा दुर्घटना घडल्या आहेत. यामुळे एमआयडीसीमध्ये काम करणारे त्रस्त आहेत. एमआयए, पीडब्ल्यूडी अणि एमआयडीसीच्या सहकार्याने या भागात चेकपोस्ट तयार करण्यासाठी तयार आहे. विभागातर्फे परवानगी मिळाल्यास हे कार्य सहजरीत्या पूर्ण होईल.
सदस्यांनी सांगितले की, या भागात असामाजिक तत्त्वांची नेहमीच गर्दी असते. अवैध वसुलीवर त्यांचा भर असतो. विशेषत: सायंकाळी आणि रात्री ते जास्त सक्रिय असतात. इलेक्ट्रॉनिक्स झोनमधील महिला कर्मचाऱ्यांसोबत अभद्र व्यवहार करण्यापर्यंत त्यांची हिंमत वाढली आहे. एमआयडीसी भागात अवैध कबाडीची दुकाने उघडली आहेत. या ठिकाणी कारखान्यांमधील चोरलेल्या मालाची खरेदी-विक्री होते. चोरीच्या घटनांमध्ये असामाजिक तत्त्वांचा जास्त सहभाग आहे. या भागात अतिक्रमण मोहीम राबविण्याची गरज आहे. वाडी टोलनाक्याजवळ परीक्षा केंद्र असल्यामुळे वाहतुकीच्या कोंडीमुळे समस्या वाढली आहे.
एसीपी सिद्धार्थ शिंदे यांनी यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. दोन्ही अधिकाऱ्यांनी सांगितले की, एमआयडीसीसोबत चर्चा करून अतिक्रमण निर्मूलन कार्यक्रम आणि अवैध बांधकाम तोडण्याची कारवाई सुरू करण्यात येईल. परीक्षा केंद्राच्या संचालकांना पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यास सांगण्यात येईल. अधिकाऱ्यांनी तीन महिन्यात बैठक घेण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी असोसिएशनचे सहसचिव प्रवीण पालकर, पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते. कोषाध्यक्ष मुरली मोहन पंटुला यांनी संचालन केले आणि आभार मानले.