उद्योजकांना प्रतीक्षा भूमिपुत्रांची; १० हजार कामगारांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 12:14 PM2020-05-29T12:14:49+5:302020-05-29T12:15:08+5:30

कोरोना लॉकडाऊननंतर सर्वच उद्योगधंदे बंद झाल्यानंतर परप्रांतीय कामगारांनी स्वगृही पळ काढला आहे. त्यामुळे बुटीबोरी, हिंगणा, कळमेश्वर आणि जिल्ह्यातील अनेक औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमध्ये हजारो जागा रिक्त झाल्या आहेत.

Entrepreneurs waiting for workers; 10,000 workers needed | उद्योजकांना प्रतीक्षा भूमिपुत्रांची; १० हजार कामगारांची गरज

उद्योजकांना प्रतीक्षा भूमिपुत्रांची; १० हजार कामगारांची गरज

googlenewsNext
ठळक मुद्देपरप्रांतीयांनी पाठ फिरविल्याने स्थानिक मजुरांना हाक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना लॉकडाऊननंतर सर्वच उद्योगधंदे बंद झाल्यानंतर परप्रांतीय कामगारांनी स्वगृही पळ काढला आहे. त्यामुळे बुटीबोरी, हिंगणा, कळमेश्वर आणि जिल्ह्यातील अनेक औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमध्ये हजारो जागा रिक्त झाल्या आहेत. नंतर उद्योग सुरू झाल्यानंतर मजुरांअभावी उत्पादन ३० ते ४० टक्के क्षमतेने सुरू आहे. भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळत नाहीत, अशी ओरड करणाऱ्यांसाठी आता संधी आहे. सद्यस्थितीत औद्योगिक वसाहतींमध्ये १० हजार तांत्रिक कामगार आणि मजुरांना रोजगार मिळण्याची संधी आहे.

औद्योगिक वसाहतीतील सर्वच उद्योगांमध्ये कामगार भरती सुरू आहे. ही संधी साधण्याचे आवाहन उद्योजकांनी केले आहे. उद्योजकांनी दिलेल्या हाकेला आता भूमिपुत्रांचा कितपत प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

परप्रांतीय कामगार परतण्यास वर्ष लागणार
औद्योगिक वसाहतीत बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसा, झारखंड, पश्चिम बंगाल येथून कामगार कुटुंबीयांसह येतात. कोरोनामुळे जवळपास ८० टक्के म्हणजेच जवळपास ३० हजार कामगार परतले आहेत. उद्योगधंदे सुरळीत झाल्यास वर्षभरात यातील बहुतांश कामगार परत येतील, असा उद्योजकांना अंदाज आहे. त्यापूर्वी भूमिपुत्रांना नोकºयांची संधी साधण्याची गरज आहे. आयटीआय पूर्ण केलेल्यांना तांत्रिक कर्मचारी पदावर जास्त संधी आहे.
कामगारांना इंजिनिअरिंगसह सर्वच कारखान्यांमध्ये रोजगार मिळणार आहे. फॉन्ड्री, कास्टिंग ग्राईडिंग, लोडिंग-अनलोडिंग, डिस्पॅच, पॅकिंग, टेक्सटाईल, रसायने, कृषी प्रक्रिया व औषधी उद्योग, पशुखाद्य, फॅब्रिकेशन, कोरेगेटेड बॉक्स तयार करणे, शीतगृहे अशा उद्योगात संधी आहे. या उद्योगांमध्ये कामगारांना पदवी, फारसे शिक्षण किंवा निष्णात कौशल्याची आवश्यकता नाही. तांत्रिक शिक्षण झालेल्या कौशल्यधारक तरुणांसाठी इंजिनिअरिंग मशिनरीवर सुट्या भागांचे उत्पादन, साखर कारखान्यांचे सुटे भाग निर्मिती अशा उद्योगात रोजगार उपलब्ध आहे. आठ तासांसाठी मासिक १५ ते २० हजार रुपयांपर्यंत मिळकत राहणार आहे. वसाहतीत अनेक कारखान्यांमध्ये अशा कामगारांची गरज आहे. सर्वच कारखान्यांमध्ये स्वयंचलित यंत्रसामग्रीचा उपयोग करण्यात येत असल्याने अवजड कामांचीही भीती उरली नाही. नोकरीसाठी आयटीआय झालेल्या तरुणांना थेट उद्योजकांशी संपर्क साधता येईल, असे बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

 

Web Title: Entrepreneurs waiting for workers; 10,000 workers needed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.