बनावट ओळखपत्र तयार करून नीरीत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:43 AM2018-10-03T00:43:02+5:302018-10-03T00:43:49+5:30
बनावट ओळखपत्र तयार करून राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थे(नीरी)मध्ये नोकरी मिळविण्यासाठी आलेल्या एका आरोपीला आणि त्याच्या दोन साथीदारांना बजाजनगर पोलिसांनी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बनावट ओळखपत्र तयार करून राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थे(नीरी)मध्ये नोकरी मिळविण्यासाठी आलेल्या एका आरोपीला आणि त्याच्या दोन साथीदारांना बजाजनगर पोलिसांनी अटक केली. पवन प्रकाश नक्शाने (वय २८), रितांशू चंद्रकांत नक्शाने (वय २१) आणि समीर देशपांडे (वय ४१), अशी आरोपींची नावे आहेत.
पवनला कॉम्प्युटरचे चांगले ज्ञान आहे. त्याच्याकडे प्रमाणपत्रही आहे. मात्र तो बेरोजगार आहे. त्याचा चुलत भाऊ रितांशू एका खासगी सुरक्षा कंपनीच्या माध्यमातून नीरीत सुरक्षा रक्षक म्हणून कामाला लागला होता. बेरोजगार पवनने रितांशूला तेथे चांगला जॉब असेल तर सांग, असे म्हटले होते. तीन दिवसांपूर्वी त्यांच्यात अशीच चर्चा झाली. यावेळी नीरीत कॉम्प्युटर आॅपरेटरची नोकरी मिळू शकते, असे सांगून रितांशूने पवनला दोन हजार रुपये मागितले. ही रक्कम घेतल्यानंतर रितांशूने त्याचा ओळखीचा प्रिंटिंग प्रेसचा संचालक समीर याला नीरीचे ओळखपत्र बनवून देण्यास सांगितले. समीरची प्रतापनगरात प्रिंटिंग प्रेस आहे. रितांशूने सांगितल्याप्रमाणे समीरने त्याला नीरीचे बनावट ओळखपत्र बनवून दिले. रितांशूने त्यावर नीरीच्या अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी केली. त्यानंतर हे ओळखपत्र घेऊन कॉम्प्युटर आॅपरेटरची नोकरी मिळविण्यासाठी पवनला नीरीत जाण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे पवनने सोमवारी सकाळी १० वाजता बनावट ओळखपत्राच्या आधारे नीरीत प्रवेश केला. तो संगणक कक्षाकडे जात असताना सुरक्षा रक्षकांनी त्याला रोखले. त्याच्या ओळखपत्रावर फोटो नसल्याने सुरक्षा रक्षकांना संशय आला. त्यांनी पवनला सुरक्षा अधिकारी भुवनेश्वर शिवभूती यादव (वय ४७) यांच्याकडे नेले. यादव यांनी ओळखपत्राची पाहणी केली असता, ते बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे ते कुठून मिळवले, अशी विचारणा केली असता पवनने रितांशूचे नाव सांगितले. यादव यांनी रितांशूला बोलवून घेतले. त्यानंतर या दोघांना घेऊन यादव बजाजनगर पोलीस ठाण्यात पोहचले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
प्रिंटिंग प्रेसही अडचणीत
पोलिसांनी सोमवारी पवन आणि रितांशूला ताब्यात घेतल्यानंतर ओळखपत्र कुणाकडून बनवून घेतले, त्याची चौकशी केली. त्यातून हे ओळखपत्र समीरच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये तयार करण्यात आल्याचे कळाल्याने त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. राष्ट्रीय स्तराच्या आणि संवेदनशील संस्थेची बनावट कागदपत्रे तयार केल्याच्या आरोपावरून पवन आणि रितांशूसोबत समीरलाही अटक करण्यात आली. या कारवाईमुळे समीरची प्रिंटिंग प्रेसही अडचणीत आली आहे. पोलीस प्रेसलाही सील लावण्याची कारवाई करू शकतात.